औरंगाबाद: सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी. ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, अशी टीका पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी शिवसेनेवर (shivsena) केली होती. शिंदे गटाला दुय्यम दर्जाची खाती मिळाल्याने सामनातून ही टीका करण्यात आली होती. त्यावर गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. पाटील यांच्या या टीकेचा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (ambadas danve) यांनी समाचार घेतला आहे. याच गुलाबरावांची दोन महिन्यांपूर्वीची भाषणे तपासली पाहिजे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेलं सामना हे वृत्तपत्रं आहे. त्यांच्या विचारावर चालणारं हे वृत्तपत्रं आहे. त्यावर टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही टीका केली आहे.
सामनातून जे सांगितलं ते सत्यच आहे. भाजपने महत्त्वाची खाती स्वत:कडे ठेवली आहेत. सामना हे बाळासाहेबांच्या विचारांचं दैनिक आहे. त्यामुळे सामनावर टीका करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. टीका करणारे गुलाबराव पाटील हेच उंदराची चिंधी आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
मुंबईतून भ्रष्टाचाराची कीड उखडून फेकू असं विधान भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शेलारांनी शिवसेना साफ करण्याची भाषा करू नये. ही कीड उपटून टाकण्याआधी गावितांवर जे भाजपने आरोप केले होते, ती कीड शेलारांनी आधी दूर केली पाहिजे. जे खासदार शिंदे गटात आले, त्यांच्यावर भाजपने आरोप केले ती कीड दूर केली पाहिजे. सोमय्यांनी शिंदे गटातील आमदारांवर लावलेल्या आरोपांचं काय झालं? ही कीड शेलारांनी दूर केलीय का? असा सवाल त्यांनी केला.
सामना जर कागदाचा लगदा आहे तर त्याची दखल का घेता? जर सामना कागदाचा लगदा आहे तर मीडिया त्यावर बातम्या का करते? तुम्ही सामनाला का सीरियसली घेता? सोडून द्या. त्यावर बोलूच नका. लगदा असेल तर हा लगदा उलटा घुसतो तेव्हा कळेल त्यांना, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी सामनातील टीकेवर भाष्य करताना शिवसेनेवर हल्ला चढवला होता. सामनातून झालेली टीका म्हणजे उंदराला सापडली चिंधी. ती इकडे ठेऊ की तिकडे ठेऊ, एवढंच काम चाललंय, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली होती. खातं कुणाला कोणतं आलं त्यापेक्षा ही सामूहिक जबाबदारी सरकारची असते. मी पाणीपुरवठा मंत्री आहे. म्हणजे माझी इतर खात्यावर जबाबदारी नाहीये का? मंत्र्यांची जबाबदारी राज्याच्या प्रत्येक विभागाचे काम करण्याची असते. त्यामुळे खातं कमी जास्त इकडे तिकडे होऊ शकते. त्यामुळे विरोधकांना काहीच सापडलं नाही म्हणून अशी टीका सुरू आहे, असेही गुलाबराव पाटील म्हणाले होते.