समोर दिसताच दानवे पाया पडले, खैरेंच्या बाजूला बसले, अखेर ‘तो’ वाद मिटला?
गेल्या अनेक दिवसांत माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे.

Chandrakant Khaire Vs Ambadas Danve : गेल्या अनेक दिवसांत माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. हे दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील असून त्यांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे. असे असले तरी या दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्ववादातून वाद निर्माण झाले आहेत. आता मात्र या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण आमच्यात वाद नव्हते. माझ्याकडून तर कोणताही वाद नव्हता, असे दानवे म्हणाले आहेत. तर मी चार पावले मागे यायला तयार आहे, असे खैरे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे अंबादास दानवे हे खैरे यांच्या पाया पडले आहेत.
चंद्रकांत खैरे यांनी काय प्रतिक्रिया दिली?
ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचा नाशिक शहरात गटमेळावा होता. या गटमेळाव्याच्या कार्यक्रमात अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन्ही नेते उपस्थित होते. यावेळी या दोन्ही नेत्यांशी ‘टीव्ही 9 मराठी’ने संवाद साधला. यावेळी बोलताना दोन्ही नेत्यांनी सबुरीची भूमिका घेतली. “मराठवाड्यातील मेळावा हा छोटा होता. त्यामुळे मला कदाचित बोलावलं नसेल. दानवे यांनी आताच भाषण केले. त्यांनी भाषण केल्याप्रमाणे ते सर्वांशी बोलले, सर्वांशी चांगले वागले तर संघटना आणखी वाढेल,” अशी अपेक्षा खैरे यांनी व्यक्त केली.
मी चार पावले मागे येतो- खैरे
तसेच, “दानवें जे भाषणात बोलले ती कृती प्रत्यक्ष केली तर संघटना आणखी मोठी होईल. मी कुठेही विरोध करत नाही. उद्धव ठाकरे यांच्यासाठी मी चार पावले मागे येतो, असे म्हणत मी वाद मिटवण्यासाठी अजूनही तयार आहे,” असे संकेतही खैरे यांनी दिले.
माझ्या मनात तरी मतभेद नव्हता- दानवे
दुसरीकडे माझ्याकडून कोणताही वाद नव्हता, असे दानवे यांनी स्पष्ट केले. “माझ्याकडून कोणताही वाद कधीच नव्हता. मी त्यांचं दर्शन घेतलं. मी त्यांच्या पाया पडलो. आमच्यात मतभेद कधीच नव्हते. माझ्या मनात तरी मतभेद नव्हते. मी जे भाषणात जे बोललो तेच प्रत्यक्षात आणलं म्हणून मी गटप्रमुख या पदापासून ते विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्यापर्यंत आलो आहे,” असे म्हणत आमच्यात सर्वकाही आलेबल आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला.
नेमकं काय घडलं होतं?
काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात ठाकरे यांच्या शिवसेनेचा एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मला बोलावले नाही म्हणून खैरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. दानवे मला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवत नाहीत. पक्षाचा कार्यक्रम असला तरी माझ्याशी चर्चा करत नाहीत, असा संताप खैरे यांनी व्यक्त केला होता. तसेच ही तक्रार मी उद्धव ठाकरे यांच्यापुढे मांडणार आहे, असेही खैरेंनी म्हटलं होतं. ठाकरेंची भेट झाल्यानंतर त्यांनी आता आमच्यातील वाद मिटला आहे, असे स्पष्ट केले होते. तर मी खैरे यांनी कुठेही डावललेलं नाही. ते आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांचे मार्गदर्शन घेतो, अशी भूमिका दानवे यांनी घेतली होती.