Amit Shah | 1962 ते आजच्या घडामोडी, संसदेत दोन हात करुया, अमित शाहांचे राहुल गांधींना खुले आवाहन
राहुल गांधी यांनी वापरलेला हॅशटॅग 'सरेंडर मोदी'ला पाकिस्तान आणि चीनकडून उत्तेजन मिळत आहे, याबाबत राहुल यांनी आत्मपरीक्षण करावे, असे शाह म्हणाले.
नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर उथळ राजकारण करत असल्याचा आरोप केला आहे. चीनसोबत सीमेवर तणावाचे वातावरण असताना चीन आणि पाकिस्तानला आवडेल अशी टीका केल्याचा घणाघातही शाहांनी केला. सरकार संसदेत चर्चेसाठी तयार आहे, 1962 पासून आजपर्यंतच्या घडामोडींवर दोन-दोन हात करुया, असे खुले आवाहन शाहांनी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले. (Amit Shah challenges Rahul Gandhi for open debate on 1962 and other issues)
राहुल गांधी यांनी वापरलेला हॅशटॅग ‘सरेंडर मोदी’ला पाकिस्तान आणि चीनकडून उत्तेजन मिळत आहे, याबाबत राहुल यांनी आत्मपरीक्षण करावे, असे शाह म्हणाले.
“भारतविरोधी प्रचार हाताळण्यास सरकार पूर्णपणे सक्षम होते. परंतु एखाद्या मोठ्या राजकीय पक्षाचे माजी अध्यक्ष संकटाच्या वेळी उथळ मनाचे राजकारण करतात, तेव्हा ते वेदनादायक होते.” अशी खंत अमित शाह यांनी बोलून दाखवली.
“राहुल गांधी यांच्या हॅशटॅगला पाकिस्तान आणि चीनने उत्तेजन दिले आहे. ही राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षासाठी आत्मपरीक्षणाची बाब आहे, चिंतेची बाब आहे. चीन आणि पाकिस्तानला रुचणारी वक्तव्ये तुम्ही करता, तेही अशा संकटाच्या वेळी” असं अमित शाह म्हणाले.
भारतीय भूमीत चीनी सैन्य आहे का, या ‘एएनआय’ने विचारलेल्या प्रश्नाला बगल देत गृहमंत्री अमित शाह म्हणाले की “प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलएसी) च्या परिस्थितीविषयी भाष्य करणे योग्य नाही. माहिती घेतली जात आहे आणि गरज असल्यास उत्तर देऊ” असं शाह यांनी सांगितलं.
हेही वाचा : नरेंद्र मोदी खरं तर ‘सरेंडर’ मोदी, राहुल गांधी यांचा निशाणा
“संसदेचे अधिवेशन असेल. आपण चर्चा करु इच्छित असल्यास, आम्ही तयार आहोत. 1962 पासून आजपर्यंत सर्वांवर चर्चा होऊ द्या. कोणालाही चर्चेची भीती वाटत नाही. जेव्हा देशातील सैनिक संघर्ष करत आहेत, सरकार ठोस पावले उचलत आहे. त्यावेळी पाकिस्तान आणि चीनला खूष करणारी विधाने करु नयेत”, अशी अपेक्षा अमित शाह यांनी राहुल गांधी यांच्याकडून व्यक्त केली.
“इंदिरा गांधी यांच्यानंतर गांधी घराण्याबाहेरचा एकही काँग्रेस अध्यक्ष झाला आहे का, असा सवाल करत काँग्रेसने लोकशाहीविषयी बोलू नये, असा टोलाही अमित शह यांनी लगावला. “अडवाणीजी, राजनाथजी, नितीनजी, राजनाथजी यांच्यानंतर मी भाजप अध्यक्ष झालो आणि आता नड्डाजी झाले. यापैकी कोणीतरी एकाच कुटुंबातील सदस्य आहे का?” असा प्रतिप्रश्न त्यांनी विचारला.
Rahul indulging in “shallow minded politics”, ready for “robust debate” in Parliament on China: Amit Shah
Read @ANI Story | https://t.co/N1lrUXlpJp pic.twitter.com/UmxSwkEYv7
— ANI Digital (@ani_digital) June 28, 2020
(Amit Shah challenges Rahul Gandhi for open debate on 1962 and other issues)