Amit Shah : अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी, किती जागा जिंकून मोदी होणार तिसऱ्यांदा पंतप्रधान?; थेटच सांगितलं

| Updated on: Apr 12, 2023 | 7:25 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच सत्तेत येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहेत, असा दावा अमित शाह यांनी केला आहे.

Amit Shah : अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी, किती जागा जिंकून मोदी होणार तिसऱ्यांदा पंतप्रधान?; थेटच सांगितलं
amit shah
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

डिब्रुगड : लोकसभा निवडणुकीला अवघं वर्ष उरलं आहे. त्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. सत्तेचा सोपान सोपा जावा म्हणून भाजपने आता मुस्लिम मतदारांवरही फोकस केला आहे. हे सुरू असतानाच भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मोठा दावा केला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीबाबत अमित शाह यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. येत्या 2024च्या निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेत येणार आहे. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असल्याचं भाकीत शाह यांनी केलं आहे. तसेच भाजपला किती जागा मिळणार याचा आकडाही सांगितला आहे.

आसामच्या डिब्रुगड येथे एका सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी हा दावा केला. तसेच राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाही चढवला. लवकरच काँग्रेस संपूर्ण देशातून हद्दपार होईल, असा दावा अमित शाह यांनी केला आहे. 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आसाममधील 14 पैकी 12 जागांवर विजय मिळवेल. तसेच 300 हून अधिक जागा जिंकून भाजप बहुमत मिळवेल. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील, असा दावा अमित शाह यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

राहुल गांधींनी बदलावं

यावेळी त्यांनी राहुल गांधी यांना बदलण्याचा सल्ला दिला. राहुल, आता तुम्हाला बदलावच लागेल. नाही तर संपूर्ण देशात काँग्रेसचा सफाया होईल. पूर्वेकडील राज्यात जे झालं तेच होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बाह्य शत्रूंपासून देशाचं संरक्षण केलं. पूर्वोत्तर राज्यांमध्ये शांतता प्रस्थापित केली. पण काँग्रेसला कबर खोदायची आहे. मी त्यांना एवढेच सांगेल की, तुम्ही मोदींना जेवढ्या शिव्या द्याल, तेवढ्याच वेगाने आमचा विजय होईल, असं शाह यांनी ठणकावून सांगितलं.

तीन राज्यात भाजपच

पूर्वोत्तरमधील तीन राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. त्रिपुरात भाजप तिसऱ्यांदा सत्तेत आली. नागालँड आणि मेघालयात आणि मित्रपक्षांशी मिळवून सत्ता स्थापन केली. राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा सुरू केली आणि पूर्वोत्तर राज्यात काँग्रेसचं पानीपत झालं. पण तरीही ते बदलणार नाही. राहुल गांधी विदेशात जाऊन देशाला बदनाम करत आहेत. कोणत्याही देशभक्त नागरिकाने असं करणं योग्य आहे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काँग्रेसचं नामोनिशान नाही

यावेळी त्यांनी राज्यातील हिमंत बिस्वा सरमा सरकारचं कौतुक केलं. हिमंत बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर आसाममध्ये विविध योजना आणि विकास कामांना वेगाने सुरुवात झाली. 2016पासूनच भाजपचा आसाममध्ये विजय मार्च सुरू आहे. त्याबद्दल मी येथील नागरिकांचे आभारच मानतो. काँग्रेस पूर्वोत्तर राज्यात सर्वात मोठा पक्ष होता. आता काँग्रेसचं नामोनिशान राहिलेलं नाही, असंही ते म्हणाले.