जे महाराष्ट्रात घडत होतं, तेच बंगालमध्ये? शाहांची स्ट्रॅटेजी, भाजपात धूसफुस?

भारतीय जनता पक्षाकडून बंगालमधील आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

जे महाराष्ट्रात घडत होतं, तेच बंगालमध्ये? शाहांची स्ट्रॅटेजी, भाजपात धूसफुस?
Follow us
| Updated on: Dec 26, 2020 | 3:34 PM

कोलकाता : भारतीय जनता पक्षाकडून बंगालमधील आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. महाराष्ट्रात 2019 ची विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाने वापरलेली स्ट्रॅटेजी भाजप आता बंगालमध्ये वापरत असल्याचे दिसत आहे. 2019 च्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने दोन्ही पक्षांच्या अनेक बड्या नेत्यांना आपल्याकडे वळवलं होतं. भाजप तीच स्ट्रॅटेजी सध्या बंगालमध्ये सत्ताधारी तृणमूल काँग्रेसविरोधात (टीएमसी) वापरत असल्याचे दिसत आहे. (Amit Shah using Maharashtra Pattern in West Bengal Assembly election 2021)

बंगाल भाजपमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसमधून जोरदार इनकमिंग सुरु झालं आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमधील असंतोष वाढत आहे. याविरोधात बोलणाऱ्या सायंतन बसू आणि अग्निमित्र पाल या दोन भाजप नेत्यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. टीएमसीच्या बंडखोर नेत्यांना पक्षात घेण्यावरुन भाजपचे स्थानिक नेते विविध सवाल उपस्थित करत आहेत. बंगालमध्ये अनेक ठिकाणी ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून पक्षाला अधिक मजबूत करण्यासाठी मेहनत घेतली आहे, अशा नेत्यांना डावलून तृणमूलच्या नेत्यांना विधानसभेचं तिकीट दिलं जाण्याची शक्यता असल्याने भाजप नेत्यांमधील असंतोष वाढू लागला आहे. तसेच ज्या मतदारसंघांमध्ये भाजप मजबूत स्थितीत आहे, तिथल्या टीएमसी नेत्यांना पक्षात का घेतलं जातंय? पक्षाला मजबूत करणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष का केलं जातंय? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.

बाबूल सुप्रियोंच्या नाराजीपुढे पक्षश्रेष्ठींची माघार

दरम्यान, बाबूल सुप्रियो यांच्या नाराजीमुळेच भाजप नेत्यांनी आसनसोल येथील टीएमसी प्रमुख आणि पांडवेश्वर मतदार संघाचे आमदार जितेंद्र तिवारी यांना पक्षात घेण्यास नकार दिला. तसेच तिवारी यांना टीएमसीत परत जावे लागले. सुप्रियो यांच्याप्रमाणेच अनेक भाजप नेत्यांमध्ये पक्षात सुरु असलेल्या इनकमिंगमुळे नाराजी आहे. परंतु इतर नेते सुप्रियो यांच्याप्रमाणे ताकदवान नाहीत, त्यामुळेच त्यांचे पक्षश्रेष्ठींपुढे काही चालले नाही. त्यांच्या मतांना केंद्रातील किंवा दिल्लीतल्या भाजप नेत्यांनी फार किंमत दिली नाही.

टीएमसी नेत्यांना फोडण्यासाठी भाजपकडून मलईदार पदांचं अमिष

बांकुडा जिल्ह्यातील विष्णूपूर मतदार संघातील भाजपचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मंडल यांनी याच आठवड्यात भाजपला रामराम करत टीएमसीत जाणं पसंत केलं. त्यानंतर सुजाता मंडल यांनी आरोप केला होता की, टीएमसीमधील नेत्यांना पक्षात घेण्यासाठी भाजकडून अनेक मलईदार पदांचं अमिष दाखवलं जात आहे. टीएमसीमधील नेत्यांना फोडण्यासाठी भाजपकडून अनेक प्रकारचे प्रयत्न सुरु आहेत. अनेक संधीसाधू आणि दलबदलू लोकांना पक्षात सामील करुन घेतलं जात आहे. त्यामुळेच पक्षातील जुने नेते आणि कार्यकर्ते पक्षावर नाराज असून त्यांत्यात असंतोष वाढत आहे.

इनकमिंगला विरोध करणाऱ्या भाजप नेत्यांना कारणे दाखवा नोटीस

या आठवड्यात पश्चिम मेदिनीपूर आणि दुर्गापूरमध्ये भाजपमधील जुन्या आणि नव्या नेत्यांवरुन कार्यकर्त्यांमध्ये मोठे राडे झाले. या दोन्ही विभागांमध्ये भाजपमध्ये टीएमसीतील नेत्यांना प्रवेश दिल्याच्या निषेधार्थ पोस्टर लावण्यात आले होते. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या मोहिमेविरुद्ध पोस्टर्सच्या माध्यमातून आवाज उठवला होता. टीएमसीचे आमदार जितेंद्र तिवारी यांना पक्षात प्रवेश दिल्याबद्दल सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त करणाऱ्या आणि तिवारी यांच्या प्रवेशाला विरोध करणाऱ्या प्रदेश महासचिव सांयतन बसू आणि महिला मोर्चाचे प्रमुख अग्निमित्र पाल या दोन भाजप नेत्यांना कारणे दाखवा नोटीस धाडली आहे. याप्रकरणी दोन्ही नेत्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

टीएमसी नेत्यांसाठी निष्ठावान कार्यकर्त्यांकडे भाजपचं दुर्लक्ष

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सामील होणाऱ्या टीएमसी नेत्यांची यादी मोठी होत चालली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे भाजपची सेवा करणारे नेते-कार्यकर्ते याबाबत पक्षात आणि उघडपणेदेखील नाराजी व्यक्त करत आहेत, तसेच अनेक ठिकाणी विरोधदेखील दर्शवत आहेत. पक्षाला इतक्या वर्षांपासून मजबूत करणाऱ्या नेत्यांऐवजी टीएमसीतून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांना मलईदार पदं सोपवली जात आहेत, त्यामुळे पक्षातील नेत्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तसेच टीएमसीतून येणाऱ्या अनेक नेत्यांना भाजपकडून विधानसभेचं तिकीट देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. त्यामुळे विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून मेहनत घेणाऱ्या, पक्षबांधणी करणाऱ्या भाजप नेत्यांना डावललं जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षाचे नेते-कार्यकर्ते पक्षावर नाराज आहेत.

नोटिसा पाठवून स्वतःच्याच पक्षातील नेत्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न

स्वतःच्या पक्षातील लोकांमध्ये नाराजी असताना ती दूर करण्याऐवजी भाजपचं नेतृत्व मात्र टीएमसीतील नेत्यांना फोडण्यासाठी विविध प्रकारच्या रणनीती आखण्यात व्यस्त आहे. पक्षातील नेत्यांनी विरोध केला तर अथवा नाराजी व्यक्त केली तर त्यांना कारणे दाखवा नोटीसा पाठवून दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत चार नेत्यांना भाजपने कारणे दाखवा नोटीसा पाठवल्या आहेत. पक्षाने त्यांच्यावर पक्षविरोधात कारवाया केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अमित शाहांच्या स्ट्रॅटेजीबाबत अनेक सवाल

पक्षात सुरु असलेल्या इनकमिंगबद्दल सार्वजनिकरित्या कोणीही काहीही बोलत नसलं तरी इतर पक्षांमधून भाजपमध्ये येणाऱ्या नेत्यांचा ट्रॅक रेकॉर्ड तपासल्यास भाजप नेत्यांच्या चिंता अधिक वाढल्या आहेत. याबाबत अनेक उदाहरणं आहेत. त्यापैकी नागराकाटा मतदारसंघाचं उदाहरण देता येईल. या मतदारसंघातील टीएमसीचे आमदार सुकरा मुंडा यांना भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. परंतु यांच्या मतदार संघात मागील लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष पहिल्या स्थानावर होता. अशा परिस्थितीत त्यांना पक्षात घेण्याची काय गरज होती? असा सवाल उपस्थित केला जात आहे. म्हणजे ज्या मतदार संघात भाजप मजबूत स्थितीत आहे, तिथल्या टीएमसी नेत्यांना पक्षात घेतल्याने पक्षाला किती फायदा होणार आहे? याचा विचार पक्षश्रेष्ठींनी केला आहे का?

मालदा जिल्ह्यातील गाजोल मतदार संघाबाबतही असंच उदाहरण देता येईल. या मतदार संघातील आमदार दीपाली विश्वाल यांनाही भाजपने पक्षात प्रवेश दिला आहे. प्रदेश भाजपच्या एका नेत्याने त्यांच्या नावाचा उल्लेख करु नये या एका अटीवर सांगितले की, मागील लोकसभा निवडणुकीतील गाजोल मतदार संघातील भाजपचा परफॉर्मन्स पाहिलात तर कोणाच्याही लक्षात येईल की, दीपाली यांना पक्षात घेतल्याने पक्षाला खास फायदा होणार नाही.

पुरुलिया मतदार संघातील काँग्रेस आमदार सुदीप मुखर्जी यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर तिथले स्थानिक भाजप नेते म्हणत आहेत की, गेल्या लोकसभा निवडणुकीत पुरुलियामध्ये भाजपला 53 टक्के मतं मिळाली होती, तर काँग्रेसला केवळ 4.6 टक्के मतं मिळाली होती, मग सुदीप यांना पक्षात घेण्याची काय गरज होती? ही आणि अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळेच अमित शाहांच्या स्ट्रॅटेजीबाबत अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

संबंधित बातम्या:

ममता बॅनर्जी-अमित शाह, दोघांमध्ये कोण श्रीमंत, कुणाकडे किती पैसा?

भेटा काँग्रेसच्या नव्या चाणक्यांना, प्रियंका गांधी काय काय करतायत ते वाचा

बंगालवर प्रशांत किशोरची ‘ट्विटर प्रतिज्ञा’, भाजपला किती जागा मिळणार? खळबळजनक दावा

शहांचा दौरा आटोपला अन् भाजप खासदाराची बायको टीएमसीत

(Amit Shah using Maharashtra Pattern in West Bengal Assembly election 2021)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.