अमित शहा प्रभावशाली नेत्यांपैकी एक, अमोल कोल्हे यांनी उधळली स्तुतीसुमने
अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जातील की, नाही हा विषय भाजपचे वरिष्ठ आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये आहे.

संदीप राजघोळकर,Tv9 मराठी, प्रतिनिधी, नवी दिल्ली : अमित शहा हे प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत, असं वक्तव्य खासदार अमोल कोल्हे यांनी केलंय. मागण्या पूर्ण होण्यासाठी प्रभावशाली नेत्यांचं पाठबळ हवं, असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. अमित शहा हे केंद्रात सत्तेत असलेल्या प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. सीबीएससीच्या अभ्यासक्रमात शिवाजी महाराजांचा इतिहास असावा, अशी खंत व्यक्त करतो. शिवनेरी किल्ल्यावर महाराजांच्या स्वराज्याचा भगवा ध्वज नाही. अशा मागण्या पूर्ण होण्याच्या दृष्टीनं पाठबळ असावं लागतं. तेव्हा या मागण्या पूर्ण होण्यासाठी मदत होऊ शकते, असंही कोल्हे म्हणाले.
अमोल कोल्हे भाजपात जाणार का?
माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, डॉ. अमोल कोल्हे हे त्यांच्या नवीन मराठी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये निमंत्रण देण्यासाठी गेले होते. अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जातील की, नाही हा विषय भाजपचे वरिष्ठ आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये आहे. चित्रपटाच्या स्क्रिनिंगचं निमंत्रण करण्यासाठी अमोल कोल्हे हे अमित शहा यांच्याकडं गेले होते. मलासुद्धा अमोल कोल्हे यांनी फोन केला होता. त्यामुळं अमोल कोल्हे हे भाजपमध्ये जातील, असं वाटत नाही.
राजकीय रंग देऊ नये
अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री आहेत. म्हणून त्यांना कोणीही भेटू शकतं. एकनाथ खडसे यांनी भेटीमागचं कारण सांगितलं आहे. येणाऱ्या 5 ऑक्टोबरला छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित शिवप्रताप गरुड झेप नावाचा अमोल कोल्हे यांचा चित्रपट येत आहे. याच निमंत्रण देण्यासाठी अमोल कोल्हे हे अमित शाह यांच्याकडे गेले असतील. त्यामुळे याला राजकीय रंग देवू नये. तो एक राजशिष्ठाचाराचा एक भाग आहे. कोणत्याही मोठ्या नेत्याला भेटणे हा एक सोपस्कार आहे. एकनाथ खडसे आणि अमोल कोल्हे यांची भेट ही त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी आहे. त्याचा काहीही संबंध राजकारणाशी नसल्याचं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सांगितलं.