Amit Thackeray : अमित ठाकरेंच्या नवी मुंबईतील दौऱ्यातही भाजप नेत्यांच्या भेटीगाठी, महापालिकेतलं चित्र पालटणार?
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या महाराष्ट्रभर विद्यार्थी सेनेचा पुनर्बांधणी दौरा करत आहेत. अमित ठाकरेंचा गेल्या सात दिवसांपासून ठाणे - पालघर जिल्ह्याचा दौरा सुरु आहे. ठाणे - पालघर दौऱ्याची सांगता आज नवी मुंबईच्या दौऱ्याने झाली.
नवी मुंबई : एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या बंडातून शिवसेना अजूनही सावरण्याचा प्रयत्न करत आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे हे नेत्यांची गळती रोखण्यासाठी अटोकाट प्रयत्न करत आहेत. मात्र तरीही अनेक नेते शिंदे गाटत जात आहे. तर दुसरीकडे मनसे शिवसेनेच्या फुटीत संधी शोधताना दिसून येत आहे. मनसे नेते अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात ते स्थानिक भाजप नेत्यांच्या भेटीगाठीही घेत आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतलं चित्र हे वेगळं दिसून शकतं, असा अंदाज सध्या बांधण्यात येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे सध्या महाराष्ट्रभर विद्यार्थी सेनेचा पुनर्बांधणी दौरा करत आहेत. अमित ठाकरेंचा गेल्या सात दिवसांपासून ठाणे – पालघर जिल्ह्याचा दौरा सुरु आहे. ठाणे – पालघर दौऱ्याची सांगता आज नवी मुंबईच्या दौऱ्याने झाली.
अमित ठाकरेंचा तरुणांशी संवाद
महाविद्यालयीन तरुण / तरुणी, पक्षाचे पदाधिकारी / महाराष्ट्र सैनिक, नवी मुंबईकर यांच्याशी संवाद साधण्यासाठी या दौऱ्याचे आयोजन केले होते. आज सकाळी वाशी टोल नाका ते वाशी भव्य मोटार सायकल / कार रॅली काढून मनसे कार्यकर्त्यांनी अमित ठाकरेंचे स्वागत केले. वाशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अमित ठाकरेंनी दौऱ्याची सुरुवात केली. वाशी मध्ये गुरव ज्ञाती हॉल मध्ये शेकडो तरुणांशी अमित ठाकरेंनी संवाद साधला. तरुणांच्या महाराष्ट्र बद्दल मनसेकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेतल्या. मनविसेच्या पदाधिकाऱ्यांना विविध कॉलेज मध्ये युनिट स्थापन करण्याचे आवाहन केले. तसेच संघटन बांधणी कडे लक्ष दिले.
भाजप नेत्यांच्या भेटीगाठी काय सांगतात?
या दौऱ्या दरम्यान भाजप आमदार गणेश नाईक यांचे सुपुत्र माजी आमदार संदीप नाईक यांनी अमित ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी माजी महापौर सागर नाईक हे सुद्धा उपस्थित होते. या दौऱ्या दरम्यान नेरुळ, सेक्टर – 11 मधील शनी मंदिरात जाऊन श्री. शनैश्वर देवतांचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर व्यवस्थापनाने अमित ठाकरे यांचे स्वागत केले. दौऱ्याची सांगता संध्याकाळी बेलापूर येथील सुप्रसिद्ध इंदू वडापाव या हॉटेल ला भेट दिली. मराठी तरुणाने नाविन्यपूर्ण पद्धतीने हॉटेल व्यवसायात घेतलेल्या भरारीचे कौतुक केले, त्यामुळे राज ठाकरे यांच्यासारखीच अमित ठाकरे यांचीही तरुणाईतली क्रेझ ही वाढत चालली आहे.