अमोल कोल्हेंचा माईक बंद का झाला? राष्ट्रवादी काँग्रेसनंतर मनसेही आक्रमक, काय घडलं नेमकं?
सभागृहात महाराजांविषयी बोलू दिलं जात नसेल तर सगळ्याच खासदारांनी उठून सभात्याग करायला पाहिजे होता. अशा खासदारांचा मी धिक्कार करतो, अशी प्रतिक्रिया मनसे नेत्याने दिली.
मुंबईः संसदेच्या अधिवेशनात (Winter Session) छत्रपती शिवरायांबद्दल बोलत असताना अचानक खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा माईक बंद झाला होता. महाराष्ट्रातील महापुरुषांच्या अवमानाविरोधात संसदेत आवाज उठवतानाच माईक बंद करण्यात आला. यावरून महाराष्ट्राचे 48 खासदार (Maharashtra MP) गप्प कसे बसले, त्यांनी तेव्हाच एकजुटीने विरोध दर्शवायला हवा होता, अशी संतप्त प्रतिक्रिया मनसेने दिली आहे. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी कोल्हे यांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला.
काय घडलं होतं?
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात शून्य प्रहरात गुरूवारी राष्ट्रवादी काँग्रेस खासदार अमोल कोल्हे यांना बोलण्याची संधी देण्यात आली होती. त्यात छत्रपती शिवाजी महाराज तसेच इतर महापुरुषांबद्दल अपमानकारक बोलणं थांबवण्यासाठी कायदा करावा, अशी मागणी ते करणार होते. पण दोन वाक्ये बोलताच त्यांचा माईक बंद करण्यात आला होता. यावरून अमोल कोल्हेंनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती.
संसदेतला माइक बंद केला तरी महाराजांच्या भावना दाबता येणार नाहीत. तो तमाम शिवभक्तांचा आवाज कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
जयंत पाटील काय म्हणाले?
संसदेत अमोल कोल्हे यांचा माइक बंद करणं हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. शिवाजी महाराजांचे दिल्लीला वावडे झाले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असूनही तो भाजपाचे मुख्यमंत्री असल्यासारखे मानतो, असा टोमणाही जयंत पाटील यांनी लगावला.
मनसेचीही संतप्त प्रतिक्रिया
एरवी राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात बोलणारी मनसे या मुद्दयावरून सहमत दिसून आली. मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण म्हणाले, महापुरुषांचा वारंवार होणारा अपमान यावर एक कायदा असावा हे सांगण्याकरिता अमोल कोल्हे उभे राहिले होते. मिनिटाच्या आतच त्यांचा माईक बंद झाला. तेव्हा एकाही खासदाराने विरोध केला नाही…
सभागृहात महाराजांविषयी बोलू दिलं जात नसेल तर सगळ्याच खासदारांनी उठून सभात्याग करायला पाहिजे होता. अशा खासदारांचा मी धिक्कार करतो, अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी दिली.