Amol Mitkari : ‘काय ते मंत्री, काय ते मंत्रिमंडळ आणि काय त्यांचं हिंदुत्व… सगळं काही दिवस ओक्के’, मिटकरींची विस्तारावर शहाजीबापू स्टाईल टीका
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या खास स्टाईलमध्ये टीका केलीय.
मुंबई : एकनाथ शिंदे सरकारचा महिनाभरापेक्षा अधिक काळ रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) अखेर मंगळवारी झाला. शिंदे गट आणि भाजपच्या प्रत्येकी 9 आमदार अर्थात एकूण 18 मंत्र्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मंत्रिमंडळात टीईटी परीक्षेबाबत आरोप झालेले अब्दुल सत्तार (Abdul Sattar) आणि एका तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा आरोप केला जात असलेले संजय राठोड यांना स्थान देण्यात आलं आहे. त्यावरुन विरोधकांनी शिंदे आणि फडणवीस सरकारवर जोरदार टीका करायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांच्या खास स्टाईलमध्ये टीका केलीय.
अमोल मिटकरी म्हणाले की, आज शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. ज्यात अनेक महान नेत्यांनी शपथ घेतली. हिंदुत्वासाठी एकत्र आलेल्या या सर्वांना औटघटकेच्या सरकार स्थापनेसाठी शुभेच्छा देतो. हे सरकार किती दिवस टिकेल हे येणारा काळच ठरवेल. मात्र काही दिवसांपूर्वी ज्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत त्यांना मंत्रिमंडळात स्थान नाही, अशी भविष्यवाणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. पण त्या भविष्यवाणीला आज तिलांजली मिळाली. असो, हिंदुत्वासाठी सर्व त्याग करुन एकत्र आलेल्या मंत्रिमंडळाला शुभेच्छआ देताना इतकंच म्हणेल, काय ते मंत्री, काय ते मंत्रिमंडळ आणि काय त्यांचं हिंदुत्व.. सगळं काही दिवस ओक्के, अशी शब्दात मिटकरी यांनी शिंदे आणि फडणवीसांवर टीका केलीय.
खातेवाटपावरुनही अमोल मिटकरींचा टोला
अर्थ व गृह खात्यावर गेल्या अनेक दिवसांपासून द्वंद्व युद्ध सुरू असताना, शिंदे गटाच्या नाक्कावर टिच्चून दोन्ही महत्वाची खाते स्वतःकडे ठेवून शिंदे गटावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन. आपल्या अधिपत्याखाली हे सरकार चालेल यात शिंदे गटाला अजिबात शंका नाही, असं ट्वीटही मिटकरी यांनी केलं आहे.
अर्थ व गृह खात्यावर गेल्या अनेक दिवसांपासून द्वंद्व युद्ध सुरू असताना,शिंदे गटाच्या नाक्कावर टिच्चून दोन्हीं महत्वाची खाते स्वतःकडे ठेवून शिंदे गटावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्याबद्दल अभिनंदन.आपल्या अधिपत्याखाली हे सरकार चालेल यात शिंदे गटाला अजिबात शंका नाही.@Dev_Fadnavis pic.twitter.com/28HOgbG64l
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 9, 2022