प्रताप सरनाईकांचं मुख्यमंत्र्यांना पत्र, भाजपशी जुळवून घेण्याचा सल्ला; भाजप, राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरनाईक यांच्या पत्राबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : बेहिशेबी मालमत्ता प्रकरणा ईडीचा ससेमिरा मागे लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलंय. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना कमकुवत करत असल्याचा खळबळजनक दावा सरनाईक यांनी केलाय. इतकंच नाही तर भाजपसोबत जुळवून घेण्याचा सल्लाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सरनाईक यांच्या पत्रावर नेमकं काय मत मांडलंय, जाऊन घेऊया. (Amol Mitkari, Pankaja Munde, Chandrakant Patil’s reaction to Pratap Saranaik’s letter)
सरनाईकांनी भाजपलाच डिवचलं, मिटकरींचा दावा
प्रताप सरनाईक यांनी आपल्या पत्रातून भाजपलाच डिवचलं आहे. त्यांनी भाजपला शालेतून जोडे मारले आहेत. त्याचबरोबर तपास यंत्रणांनाही सरनाईक यांनी या पत्रातून जोडे मारले आहेत. ज्यांनी हे पत्र व्यवस्थित वाचलं असेल त्याला हे समजेल की हा भाजपलाच डिवचण्याचा प्रयत्न आहे. केंद्र सरकार आणि भाजपनं पत्राची सविस्तर चौकशी करावी मग कळेल. भाजप नेते या पत्राबाबत काही भावना बाळगून असतील तर त्याला आघाडीतील तिनही पक्ष भीक घालत नाही, असा टोलाही अमोल मिटकरी यांनी लगावलाय.
पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना सरनाईकांच्या पत्राबाबत विचारलं असता, त्यांच्या पत्राबाबत आपल्याला माहिती नाही. पण लिहिलं असले तर स्वागत आहे. त्यांनी जे पत्र लिहिलं आहे त्यावरुन सरकारच्या आजच्या परिस्थितीचा अंदाज येतो, अशी खोचक टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
प्रताप सरनाईक त्यांचे आमदार आहेत, नेते आहेत. त्यांचे नेते उद्धव ठाकरे आहेत. त्यांनी विचार करावा. आमचे नेते केंद्रात आहेत. आम्ही त्यांना सांगू. बाकी आम्ही सुरुवातीलाच सांगत होतो की, बाळासाहेब ठाकरे यांची हयात ज्यांच्याविरोधात लढण्यात गेली, त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी सरनाईक यांच्या पत्रावर दिली आहे.
प्रताप सरनाईकांचं पत्र काय?
प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. 10 जून रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्रं लिहिलं आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे. तसेच युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
तुटण्याआधी जुळवून घेतलेलं बरं
पुढील वर्षी मुंबई, ठाणे व अन्य पालिकांच्या निवडणुका आहेत. आतापर्यंत राज्यात आपली युती तुटली असली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. ते अजून तुटण्याआधी परत जुळवून घेतलेले बरे होईल. त्याचा फायदा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना आणि भविष्यात शिवसेनेला होईल. साहेब, तुम्ही योग्य निर्णय घ्यालच. माझ्या मनातील भावना तुम्हाला कळवल्या. लहान तोंडी मोठा घास घेतला. काही चुकले असेल तर दिलगिर आहे, असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.
नाहक त्रास थांबेल
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसविण्याचा तुम्ही शब्द दिला होता. तो पूर्ण करून दाखवला. तुम्ही पदाला न्यायही देत आहात. पण या परिस्थितीही राजकारण सुरू आहे. सत्तेत राहूनही काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे कार्यकर्ते, नेते फोडत आहे. आपला पक्ष कमकुवत करत असेल तर पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जुळवून घेतलेले बरे. हे माझे वैयक्तिक मत आहे. त्यामुळे निदान प्रताप सरनाईक. अनिल परब आणि रवींद्र वायकर या आपल्या सहकाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास थांबेल अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
संबंधित बातम्या :
काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करतेय, भाजपशी जुळवून घ्या; प्रताप सरनाईक यांचा लेटरबॉम्ब
साहेब, नेत्यांचे सहकार्य नाही, कुटुंबाच्या साथीने अर्जुनासारखा लढतोय; सरनाईकांची हतबलता आणि खदखद
Amol Mitkari, Pankaja Munde, Chandrakant Patil’s reaction to Pratap Saranaik’s letter