‘शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण नको, त्यांच्या आदर्शावर चाला’, अरविंद सावंतांचा राणा दाम्पत्याला खोचक सल्ला
शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनीही राणा दाम्पत्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण नको, त्यांच्या आदर्शावर चाला, असा खोचक सल्लाही सावंत यांनी राणा दाम्पत्याला दिलाय.
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावरुन सध्या अमरावतीमध्ये (Amravati) आणि राज्यात जोरदार राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), शिवसेना आणि अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. अशावेळी शिवसेनेचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनीही राणा दाम्पत्याच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवरायांच्या पुतळ्यावरुन राजकारण नको, त्यांच्या आदर्शावर चाला, असा खोचक सल्लाही सावंत यांनी राणा दाम्पत्याला दिलाय.
अरविंद सावंत म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराज यांना आम्ही आराध्य दैवत म्हणतो. आपली त्यांच्याबद्दलची आदराची भावना समोर ठेवताना ते आदर्श राजेही होते. अशा राजांना परवानगी न घेता कुठे कुणी काही केलं असतं तर चाललं असतं का. बाकी राजकीय सोडा, छत्रपतींच्या नावाने आलेलं सरकार वगैरे हे कुणी शिकवण्याची गरज नाही. कारण आम्ही जन्मापासून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणत आलो आहोत’.
‘छत्रपतींचा पुतळा उभा करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नव्हे’
त्याचबरोबर ‘आपण नियम पाळणार की नाही? जर माझ्या दैवताची विटंबना केली तर जबाबदार कोण? तर सरकार जबाबदार. मग तुम्ही कुठेही काहीही करायचं का? त्याला रितसर परवानगी आहे. महापालिकेचा, नगरपालिकेची परवानगी आहे. जागेचा ठराव आहे. परवानगी घ्या, छानपैकी जोरदार पुतळ्याचं अनावरण करा. आनंद वाटेल, कोण नको म्हणतो. पण माझ्या मनात आलं उद्या चौकात पुतळा उभा केला. उद्या दुसऱ्यानं दुसरा पुतळा उभा केला. तर या राज्याला काही आचारसंहिता राहणार नाही, कायदा-सुव्यवस्था राहणार नाही. छत्रपतींचा पुतळा उभा करणं म्हणजे प्रेम व्यक्त करणं नव्हे. तर त्यांच्या आदर्शावर जगणं म्हणजे त्यांचा आदर करणं आहे, असं मला वाटतं’, असा टोलाही सावंत यांनी राणा दाम्पत्याला लगावलाय.
‘अशा विषयानं सरकारची कोंडी होत नाही’
पुतळ्यावरुन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे का? असा सवाल सावंत यांना विचारला. त्यावर बोलताना ‘सरकारची कोंडी करण्यासाठी तुमच्याकडे विषय असले पाहिजे. त्याला गांभीर्यानं अभ्यासपूर्ण मांडणी केली पाहिजे. अशा विषयानं सरकारची कोंडी होत नाही. उलट तुमचंच हसू ठरतं. आम्ही जर कायदेमंडळात काम करणारी माणसं आहोत, तर आम्हीच जर कायद्याचं उल्लंघन करणार असू, तर आम्हीच हास्यास्पद ठरतो हे लक्षात ठेवा. अशा विषयावरुन मुख्यमंत्री टार्गेट होऊ शकत नाही’, असा दावाही त्यांनी केलाय.
गृह विभाग संपूर्ण प्रकरणाची चौकशी करेल- एकनाथ शिंदे
शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल असा कुठलाही प्रकार खपवून घेतला जाणार नाही. त्याची शहानिशा, योग्य ती चौकशी होईल आणि पुढील कारवाई गृह विभाग करेल, अशी प्रतिक्रिया नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
इतर बातम्या :