संभाजी भिडे यांना बेड्या ठोका, सहा महिने तरी त्यांना देशाच्या बाहेर ठेवा; सत्ताधारी पक्षातील आमदाराचं वक्तव्य
Bacchu Kadu on Sambhaji Bhide Statement : संभाजी भिडेना बेड्या ठोकल्या पाहिजेत, तिरंग्याचा अपमान आम्ही सहन करणार नाही; 'या' आमदाराचं रोखठोक भाष्य
अमरावती | 31 जुलै 2023 : संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली. आमदार बच्चू कडू यांनीही संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. बच्चू कडू यांनीही संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.
संभाजी भिडेना बेड्या ठोकल्या पाहिजेत, असं बच्चू कडू म्हणाले आहेत. तिरंग्याचा अपमान आम्ही कधीही सहन करणार नाही. संभाजी भिडेना बेड्या ठोकल्या पाहिजेत, असं ते म्हणाले.
हे जर थांबल नाही तर संभाजी भिडे विरोधात आम्ही रोखठोक भूमिका घेऊ. सहा महिने तरी संभाजी भिडे यांना देशाच्या बाहेर ठेवलं पाहिजे, असं म्हणत आमदार बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला आहे.
संभाजी भिडे यांचं स्वातंत्र्यामध्ये योगदान काय आहे? कधी लाठी तरी खाल्ली आहे का? अशाप्रकारे बोलत असेल तर त्यांच्या नांग्या तिथेच ठेचल्या गेल्या पाहिजेत. भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी यावर बोलले पाहिजे, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
भिडे काय म्हणालेत?
संभाजी भिडे यांनी अमरावतीच्या कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. केवळ गांधीजीच नव्हे तर महात्मा फुले आणि साईबाबांबाबतही भिडे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यावरून वादंग निर्माण झालं आहे.
आपल्या देशात महात्मा गांधींच नाही तर वीर सावरकर यांच्याबद्दल देखील बोललं गेलं आहे. राहुल गांधी सावरकरांबद्दल बोलले. आता भिडे यांनी महात्मा गांधीजीं बद्दल वक्तव्य केलं आहे. अतिशय खालच्या स्तरावर जात वक्तव्य केली जात आहेत, हे चुकीचं आहे, असं बच्चू कडू म्हणालेत.
महापुरुषांवर टीका करताना आपली औकात तपासली पाहिजे, असं म्हणत महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांना बच्चू कडू यांनी खडसावलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर टीका भाष्य केलं आहे. महात्मा गांधी यांच्याबाबतचं वक्तव्य खपवून घेणार नाही. योग्य ती चौकशी केली जाईल. महात्मा गांधी असो की सावरकर… कुणाही बद्दलची वक्तव्य खपवून घेणार नाही, असं फडणवीस म्हणालेत. तसंच भिडे आणि भाजपचा काहीही संबंध नाही, असंही ते म्हणालेत.