Amul ला टक्कर देणार Nandini, अमूल पेक्षा इतक्या रुपयांनी आहे स्वस्त
देशात अमूल ही सर्वात मोठी दूध कंपनी असली तरी कर्नाटक निवडणुकीआधी येथे यावरुन मोठा वाद पाहायला मिळत आहे. कारण काय आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये येथे यावरुन संघर्ष का पेटला आहे.
मुंबई : कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दूध कंपन्यांमधील युद्ध आता नवे वळण घेत आहे. ‘नंदिनी’ ब्रँडचे दूध ‘अमूल’च्या तुलनेत 11 रुपयांनी स्वस्त आहे, त्यामुळे देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या अमूल कंपनी पुढचं आव्हान वाढणार आहे का? गेल्या अनेक दिवसांपासून #GoBackAmul आणि #SaveNandini सोशल मीडियावर ट्रेंड करत आहेत. त्याचबरोबर राजकीय सभांमध्ये अमूलवर ‘गुजराती दूध’ असा टॅग लावण्यात आला आहे. या मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजप आमनेसामने आहेत.
‘किंमत युद्ध’
अनिल कपूरच्या नायक या चित्रपटात त्याला दुधाने आंघोळ घालण्याचे दृश्य आहे, पण सध्या हे दूध कर्नाटक निवडणुकीत मोठा मुद्दा बनला आहे. कर्नाटक को-ऑपरेटिव्ह मिल्क प्रोड्युसर्स फेडरेशन (KMF) चा ‘नंदिनी’ ब्रँड तिथे चांगली कामगिरी करत असताना निवडणुकीच्या वातावरणात अमूल ब्रँडची बंगळुरू मार्केटमध्ये झालेली एंट्री हे त्याचे कारण आहे. अमूल खरोखरच नंदिनीशी स्पर्धा करू शकेल का, कारण दोन कंपन्यांमध्ये जोरदार ‘किंमत युद्ध’ होणार हे निश्चित आहे.
सर्वात मोठा ब्रँड
अमूल हा देशातील सर्वात मोठा दुधाचा ब्रँड आहे. पण तरीही अमूल दूध संपूर्ण देशात विकले जात नाही. त्याला विविध राज्यातील दूध सहकारी संस्थांकडून स्पर्धेला सामोरे जावे लागते. ताजं प्रकरण कर्नाटकच्या KMF आणि तिच्या दूध ब्रँड नंदिनीचं आहे. अमूलपेक्षा लहान असूनही, कर्नाटक, आसपासच्या राज्यांमध्ये आणि विशेषत: बंगळुरूमध्ये ‘नंदिनी’ अनेक बाबतीत वरचढ आहे.
नंदिनी कोणत्या राज्यांमध्ये विकते दूध
KMF नंदिनी ब्रँडसाठी 24 लाख पशुपालकांकडून दररोज 81.3 लाख लिटर दूध संकलित करते. अमूल 36.4 लाख शेतकऱ्यांकडून दररोज सुमारे 2.63 कोटी लिटर दूध संकलन करते. ‘नंदिनी’ दररोज 10 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करते, तर अमूल 52 लाख लिटर दुधावर प्रक्रिया करते.
अमूल देशातील अनेक मोठ्या बाजारपेठांमध्ये आणि अनेक आशियाई देशांमध्ये दूध विकते. तर नंदिनी ब्रँडचे दूध बंगळुरू आणि कर्नाटक व्यतिरिक्त तामिळनाडू, महाराष्ट्र आणि तेलंगणा या शेजारच्या राज्यांमध्ये देखील पुरवले जाते.
नंदिनीचे दूध 11 रुपयांनी स्वस्त
अमूल आणि नंदिनीच्या किंमती बघितल्या तर इथे नंदिनी आघाडीवर आहे. दोन्ही ब्रँड टोन्ड मिल्क, फुल क्रीम मिल्क आणि दही यासारख्या जवळपास सर्व लोकप्रिय श्रेणींची विक्री करतात. पण त्यांच्या किमतीत बरीच तफावत आहे.
अमूलच्या टोन्ड दुधाची एक लिटर किंमत ५४ रुपये प्रति लिटर आणि फुल क्रीम दुधाची किंमत ६६ रुपये आहे. तर नंदिनीचे टोन्ड दूध ४३ रुपये प्रति लिटर आणि फुल क्रीम दूध ५५ रुपये प्रति लिटर आहे. म्हणजे थेट 11 रुपयांनी प्रति लिटर स्वस्त. एवढेच नाही तर अमूलचे दही सुमारे ६६ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे, तर नंदिनीचे दही १९ रुपये स्वस्त म्हणजे ४७ रुपये प्रति लिटर आहे.
नंदिनी स्वस्तात विकते कशी?
1974 मध्ये जागतिक बँकेच्या मदतीने ‘नंदिनी’ ब्रँड सुरू झाला. KMF थेट सहकार मंत्रालय, कर्नाटक राज्य सरकारच्या अंतर्गत येते. 2008 मध्ये कर्नाटक सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 2 रुपये प्रति लिटर दराने प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. सध्या तो प्रतिलिटर ६ रुपये झाला आहे.
म्हणूनच KMF देशातील इतर दूध सहकारी संस्थांपेक्षा स्वस्तात दूध विकू शकत आहे. बंगळुरूमधील दुधाच्या बाजारपेठेचा ७० टक्के भाग नंदिनीने व्यापला आहे. 33 लाख लिटर दुधाची मागणी असून त्यापैकी नंदिनी दररोज 23 लाख लिटर दुधाचा पुरवठा करते.