मोहनराव, ब्राह्मणांना नव्हे, पापक्षालन करण्याची गरज तुम्हाला; ‘या’ नेत्याचा मोहन भागवत यांच्यावर हल्लाबोल
ब्राह्मणांनी माफी मागितली पाहिजे हे मोहन भागवत यांचं कालचं त्यांचं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी अभ्यासाशिवाय हे विधान केलं आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे, असं आनंद दवे म्हणाले.
अभिजीत पोटे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे: मधल्या काळात आपल्या पूर्वजांकडून राष्ट्रीय पाप झालं आहे. एका वर्गावर अन्याय करण्यात आला. त्यामुळे ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे, असं विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केलं आहे. भागवत यांच्या या विधानाचं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी समर्थन केलं आहे. मात्र, भागवत यांचं हे विधान ब्राह्मण संघटनांना काही पटलेलं दिसत नाही. ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी भागवत यांच्या या विधानावर तीव्र आक्षेप घेतला आहे. पापक्षालन करण्याची गरज ब्राह्मणांना नव्हे तर मोहन भागवत यांना आहे, अशी टीका आनंद दवे (anand dave) यांनी केली आहे.
आनंद दवे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. ब्राह्मणांनी माफी मागितली पाहिजे हे मोहन भागवत यांचं कालचं त्यांचं वक्तव्य अत्यंत चुकीचं आहे. त्यांनी अभ्यासाशिवाय हे विधान केलं आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे, असं आनंद दवे म्हणाले.
ब्राह्मणांनी काही चुका केल्या असतील तर ब्राह्मण समाजातील काही लोकांनी त्याला विरोधही केला आहे. हे भागवतांनी सांगितलं नाही. पण असं विधान न करता सरसकट ब्राह्मणांना पापक्षालन करायला सांगितलं जात आहे. मला वाटतं मोहनराव तुम्ही पापक्षालन करण्याची आवश्यकता आहे, असं त्यांनी सांगितलं.
इथला हिंदू नराधमांच्या हाती देण्याचं पाप तुम्ही करत आहात. तुम्हीच पापक्षालन केलं पाहिजे. तुम्ही महाराष्ट्रात नाही तर भारतात जातीवाद वाढवत आहात. पापक्षालन करण्याची गरज तुम्हाला आहे. आतापर्यंत हिंदुत्वाचा जागर केला आणि आता मशिदीत मौलवींना भेटायला जात आहात. म्हणून आता पापक्षालन तुम्हीच करायला हवं, असा सल्लाही त्यांनी दिला.
दरम्यान, मोहन भागवत यांनी काल नागपूरमध्ये पुस्तक प्रकाशनावेळी जातीव्यवस्थेवर भाष्य केलं होतं. जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्थेचा आपण त्याग केला पाहिजे. त्यामुळे एका वर्गाचं नुकसान झालं आहे. आपल्या पूर्वजांकडून राष्ट्रीय पाप झालं आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी पापक्षालन केलं पाहिजे, असं मत मोहन भागवत यांनी व्यक्त केलं होतं.
तर केवळ पापक्षालन करून किंवा माफी मागून चालणार नाही. तर ते तुमच्या कृतीत आणि व्यवहारातही दिसलं पाहिजे, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले.