रावलांच्या फार्म हाऊसवर घुसखोरी प्रकरण, गोटेंना अटक होणार ?
अनिल गोटेंनी जयकुमार रावल यांच्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरी केल्याचं वृत्त फेटाळलं आहे (Anil Gote arrive at Dondaicha Police station).
धुळे : भाजप नेते आणि माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या फॉर्म हाऊसमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करुन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार अनील गोटे यांच्याविरोधात दोंडाईचा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल गोटे आज (18 डिसेंबर) दुपारी दोन वाजेच्या सुमारास दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झाले. गोटेंची चौकशीनंतर त्यांना अटक करणार, अशी भूमिका पोलिसांची आहे. तर गोटेंनी जयकुमार रावल यांच्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरी केल्याचं वृत्त फेटाळलं आहे (Anil Gote arrive at Dondaicha Police station).
जयकुमार रावल यांचं शिंदखेडा तालुक्यातील टाकरखेडा येथे तापी नदीच्या काठावर एक फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करुन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप गोटेंवर आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, “मी रावल यांच्या फार्म हाऊसजवळ गेलो होतो, पण प्रवेश केला नव्हता. मी गाडीतून बाहेर पडलो नव्हतो. मी फॉर्म हाऊसच्या व्यवस्थापकाशी बोलून परतलो होतो. रावल यांच्या सांगण्यावरुन दोंडाईचा पोलीस ठाण्यात माझ्याविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मी पोलीस ठाण्यात आलो”, असं स्पष्टीकरण गोटे यांनी आज प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिलं (Anil Gote arrive at Dondaicha Police station).
भाजप कार्यकर्त्यांनी अनिल गोटे यांच्या पोस्टरला जोडे मारले
जयकुमार रावल यांच्या फार्म हाऊसमध्ये घुसखोरीचं प्रकरण आता चांगलंच तापत आहे. अनिल गोटे दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी अनिल गोटे यांचा निषेध केला. यावेळी त्यांनी गोटे यांच्या पोस्टरवर जोडे मारले.
दोंडाईचा पोलीस स्टेशन बाहेर बाचाबाची
दरम्यान, दोंडाईचा पोलीस स्टेशन बाहेर असताना एक अज्ञात इसम आणि अनिल गोटे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या चकमकीनंतर काही काळ परिसरात तणावाचं वातावरण होतं.
हेही वाचा : यूपीए सरकारनं केलेल्या पापाचं प्रायश्चित म्हणजे नवे कृषी कायदे- नरेंद्र मोदी