‘ठाकरे सरकारच्या भ्रष्टाचाराचं स्मारक, साई रिसॉर्ट गणपतीनंतर जमीनदोस्त होणार’, किरीट सोमय्यांचं वक्तव्य
साई रिसॉर्ट पाडण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. ते म्हणाले, ' रिसोर्ट पाडण्याचे कंत्राट, पाडल्यानंतर होणाऱ्या मलब्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट कुणाला द्यायचे याची प्रक्रिया सुरू आहे. मला आशा आहे गणपतीच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होईल
मुंबईः दापोली येथील अनिल परब (Anil Parab) यांचं अनधिकृत साई रिसॉर्ट गणेशोत्सवानंतर पाडण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण बोर्डाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील या रिसॉर्टच्या (Sai Resort) बांधकामात अनियमितता असून यासाठीचा पैसा गैर व्यवहारातून आणल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय. नोएडातील ट्विन टॉवर पाडले त्याप्रमाणेच दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यात येईल, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी हे रिसॉर्ट पाडण्याचा आराखडा जाहीर केला असून कोणत्या तंत्रज्ञानाने ते पाडण्यात येईल, हेदेखील लवकरच ठरेल, असे किरीट सोमय्या म्हणाले.
‘भ्रष्टाचाराला इथे जागा नाही’
अनिल परब यांचे साई रिसॉर्ट हे मातोश्रीच्या भ्रष्टाचाराचे स्मारक आहे. हे पाडल्यानंतर त्या ठिकाणी एक बोर्ड लावण्यास मी विनंती करणार आहे, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलं. इथे भ्रष्टाचाराला जागा नाही, असा बोर्ड या ठिकाणी लावला जावा, जेणेकरून यापुढे कुणीही भ्रष्टाचार करण्याची हिंमत करणार नाही, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.
गणपतीनंतर पाडण्याची कारवाईय…
हे रिसॉर्ट पाडण्याची प्रशासकीय प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली. ते म्हणाले, ‘ रिसोर्ट पाडण्याचे कंत्राट, पाडल्यानंतर होणाऱ्या मलब्याची विल्हेवाट लावण्याचे कंत्राट कुणाला द्यायचे याची प्रक्रिया सुरू आहे. मला आशा आहे गणपतीच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि गणपतीनंतर तोडण्याची कारवाई होईल. मी आतापर्यंत 40 घोटाळे बाहेर काढले सर्व पुरावे दिलेले आहेत. मी कुणाच्या सांगण्यावर हे करत नाही. पक्षाने जे काम दिले आहे ते करतो. लवकरच मी मुख्यमंत्री यांची भेट घेऊन परब व नार्वेकर यांच्या अनधिकृत पाडलेल्या बांधकामा जवळ बॅनर लावून महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला जागा नाही असे फलक लावण्याची विनंती करणार आहे, असं सोमय्या म्हणाले.