जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले, पण… अंजली दमानिया यांचं ट्विट काय?
रिक्षाचालकांनीही रिक्षा बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवत आव्हाड यांना पाठिंबा दिला आहे. मुंब्रा बायपास रोडवर संतप्त कार्यकर्त्यांनी टायर जाळून रास्तारोको केला आहे.
ठाणे: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपच्या पदाधिकारी महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. गुन्हा दाखल झाल्यामुळे जितेंद्र आव्हाड हे अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीने या प्रकाराचा निषेध करतानाच आव्हाड यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. तर, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही ट्विट करून या प्रकारावर भाष्य करतानाच आश्चर्यही व्यक्त केलं आहे.
विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप?
जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा.
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) November 14, 2022
अंजली दमानिया यांनी जितेंद्र आव्हाड प्रकरणावर ट्विट केलं आहे. विनयभंग? काय वाट्टेल ते आरोप? जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध मी खूप लढले आहे, पण त्यांच्यावरचा हा आरोप अतिशय चुकीचा, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.
तर, आव्हाडांवर खोटा गुन्हा दाखल केला गेला आहे. हे राज्य सरकारचं षडयंत्र आहे. जितेंद्र आव्हाड हे आरएसएसच्या निशाण्यावर आहेत. हा ठरवलेला ट्रॅप होता. या ट्रॅपमध्ये भविष्यात मलाही अडकवलं जाईल. पण एक लक्षात ठेवा देशात लोकशाही आहे. आम्ही लढू. आम्ही सर्वच जितेंद्र आव्हाडांसोबत आहोत. आम्ही असंख्य लोक आव्हाड बनून या अन्यायाविरोधात लढू, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर कळवा-मुंब्र्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कळवा-मुंब्रा बंदची हाक दिली आहे. मुंब्रा येथील अमृत नगर, गुलाब पार्क आणि कौसा या परिसरात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे.
रिक्षाचालकांनीही रिक्षा बंद ठेवून या घटनेचा निषेध नोंदवत आव्हाड यांना पाठिंबा दिला आहे. मुंब्रा बायपास रोडवर संतप्त कार्यकर्त्यांनी टायर जाळून रास्तारोको केला आहे. त्यामुळे या भागात वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली आहे.
याशिवाय राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी थेट मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर जमून जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली आहेत. बदनाम करण्यासाठीच आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याने हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी केली आहे.