ED आणि CBI या तपास यंत्रणा आहेत की मोदी-शाहांचे कार्यकर्ते? : राजू शेट्टी
EVM विरोधीभूमिका घेतली म्हणून हे सगळं होत आहे. सरकारविरोधात गेलं की हेच होणार होतं. पण या लढ्यात आम्ही राज ठाकरे यांच्यासोबत आहोत, असं राजू शेट्टी यांनी नमूद केलं.
कोल्हापूर : अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडी आणि गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात CBI या तपास यंत्रणा आहेत की मोदी शाहांचे कार्यकर्ते आहेत? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठवण्यात आलेल्या नोटीसवरुन राजू शेट्टी यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं.
सरकारविरोधात गेलं की अशा यंत्रणा मागे लागतातच. 20-22 वर्षापूर्वीचा व्यवहार आहे, मग इतक्या दिवस ईडी झोपली होती का? आम्ही कोणत्याही गैरव्यवहाराचं समर्थन करत नाही, पण राजकीय सूडापोटी कारवाई होते हे स्पष्ट आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
EVM विरोधीभूमिका घेतली म्हणून हे सगळं होत आहे. सरकारविरोधात गेलं की हेच होणार होतं. पण या लढ्यात आम्ही राज ठाकरे यांच्यासोबत आहोत, असं राजू शेट्टी यांनी नमूद केलं.
महापुरामुळे आम्ही ईव्हीएमविरोधी आमचा सर्वपक्षीय मोर्चा पुढे ढकलला. मात्र भाजपवाले महाजनादेश यात्रा काढत आहेत. असल्या महापुरात यांचे मंत्री रॉबिनहूड बनून लोकांना वाचवल्याचा स्टंट करत आहेत. बोटीत फिरतायेत, पण याच महापुरात गटांगळ्या खात आहेत, असा टोला राजू शेट्टींनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना लगावला.
हिंमत असेल तर ईव्हीएमवरचा ताबा सोडा आणि मग निवडणुका घेऊन दाखवा. मतदार तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत, असं आव्हान राजू शेट्टींनी केलं.
महापुरानं या परिसरातला ऊस आणि इतर पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. ऊस क्षेत्रात एकरी किमान 3 लाख रूपयांचं नुकसान झालं आहे. साखरेचा तुटवटा हा तात्कालिक परिणाम आहे, याचा मोठा फटका बसणार नाही. पण महाराष्ट्रात यावेळी साखरेचं उत्पन्न घटेल. महाजनादेश यात्रा, मंत्र्यांचे दौरे सगळं काही व्यवस्थित सुरु आहे. पण यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी वेळ मिळत नाही, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली.
पूरग्रस्तांसाठी महामोर्चा
महापुरात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना, नागरिकांना आधार देण्यापेक्षा हे सरकार आपला जनादेश मिरवतं आहे. आम्ही या पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही. उद्या यासंदर्भात बैठक बोलावली असून लवकरच पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी महामोर्चा काढणार आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.