मोदींवर टीका झाल्यावर वाईट वाटतं, अरुण गवळीच्या पत्नीकडून मोदींची स्तुती
औरंगाबाद : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरभरुन स्तुती केली आहे. नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान आहेत, अशा शब्दात अरुण गवळीची पत्नी आशा गवळी यांनी मोदींचं कौतुक केलं. तसेच, भाजप चांगला पक्ष असून, आम्ही भाजपसोबत युती करायला तयार आहोत, असेही आशा गवळी यांनी म्हटले. जालना लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या औरंगबदला […]
औरंगाबाद : अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीच्या पत्नीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरभरुन स्तुती केली आहे. नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान आहेत, अशा शब्दात अरुण गवळीची पत्नी आशा गवळी यांनी मोदींचं कौतुक केलं. तसेच, भाजप चांगला पक्ष असून, आम्ही भाजपसोबत युती करायला तयार आहोत, असेही आशा गवळी यांनी म्हटले. जालना लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी त्या औरंगबदला आल्या आहेत.
आशा गवळी नेमकं काय म्हणाल्या?
“भाजप हा एक चांगला पक्ष आहे. आम्ही भाजपसोबत युती करायला तयार आहोत. नरेंद्र मोदी हे चांगले पंतप्रधान आहेत. पण त्यांच्यावर जी टीका होते, त्यामुळे वाईट वाटतं.” असे म्हणत आशा गवळी पुढे म्हणाल्या, “येणाऱ्या विधानसभा निवडणुका आम्ही लढवणार आहोत. महाराष्ट्रात सर्वत्र आम्ही उमेदवार देणार आहोत.”
“सध्या देशात राजकारणासाठी पैशांचा बाजार सुरु आहे. हे बदलण्यासाठी आम्ही राजकारणात उमेदवार दिला आहे.”, असेही आशा गवळी यांनी यावेळी म्हटले. तसेच, मी निवडणूक लढवणार नाही मात्र माझ्या मुलीला विधानसभेला उभं करणार आहे. माझी मुलगी खूप चांगलं काम करत आहे, असे आशा गवळी यांनी नमूद केले.
कोण आहेत आशा गवळी?
आशा गवळी या अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांची पत्नी आहे. अरुण गवळी सध्या शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. अरुण गवळीने एकेकाळी मुंबईमध्ये आपली दहशत निर्माण केली होती. कुख्यात गुंड आणि अंडरवर्ल्ड डॉन म्हणून अरुण गवळीची गुन्हेगारी विश्वात ओळख आहे.
अरुण गवळी यांची कन्या गीता गवळी या राजकारणात आहे. त्यात आता आशा गवळी यांनी भाजपसोबत युतीची इच्छा व्यक्त केली असून, मोदींचं कौतुकही केले असल्याने, पुढे गवळी कुटुंब भाजपच्या जवळ जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आशा गवळी अधिकृतरित्या भाजपच्या व्यासपीठावर दिसतात का आणि दिसल्या तर शिवसेनेची यावर भूमिका काय असेल, याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे.