भिवंडी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक पवित्रा घेतला. मशिंदीवरील भोंगे (Loudspeaker on Mosque) हटवण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला अल्टिमेटमही दिलं. त्या मुद्द्यावरुन राज्यात जोरदार राजकारण पाहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर आता एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भिवंडीमध्ये सभा पार पडली. ओवैसी यांचं भाषण सुरु झालं आणि त्यावेळी अजान सुरु झाली. त्यावेळी ओवैसी यांनीही आपलं भाषण थांबवून अन्य नेते आणि कार्यकर्त्यांसह नमाज अदा केली. त्याचा व्हिडीओही आता व्हायरल होत आहे. भिवंडीतील परशुराम टॉवर मैदानात ओवैसी यांची सभा पार पडली. त्यावेळी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आणि माजी आमदार वारीस पठाणही उपस्थित होते.
असदुद्दीन ओवैसी सभेसाठी पोहोचले त्यावेळी संद्याकाळच्या नमाजाची वेळ झाली होती. ओवैसी यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केल्यानंतर अजान सुरु झाली. स्पीकरवरुन अजान देण्यात येत होती. त्यावेळी ओवैसींनी भाषण थांबवलं आणि एमआयएमचे नेते आणि कार्यकर्त्यांसह नमाज अदा केली. व्यासपीठासमोर टाकलेल्या चादरवर ओवैसी, इम्तियाज जलील, वारिस पठाण यांच्यासह अन्य नेते आणि पदाधिकारी नमाज अदा करतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ओवैसी यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. महाविकास आघाडीला टार्गेट करताना ओवैसी यांनी नवाब मलिकांबाबत प्रश्न उपस्थित केला. मलिकांबाबत बोलताना ओवैसी म्हणाले की, मलिक मुस्लिम आहेत म्हणून जेलमध्ये आहे. शरद पवार मोदींना भेटले तेव्हा त्यांना राऊतांवर कारवाई करु नका म्हणून सांगायची आठवण झाली. मात्र नवाब मलिकांची आठवण आली नाही का? असा सवाल ओवैसी यांनी शरद पवार आणि महाविकास आघाडीला केला आहे. तसंच मलिकांची अटक म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डाव असल्याचा गंभीर आरोप ओवैसी यांनी केलाय. इतकंच नाही तर नवाब मलिक हे तुमच्याच पार्टीचे आहेत ना, तेव्हा मलिकांचेही नाव घ्यायचे होते. मात्र नवाब मलिकांना जेलमध्ये टाकलं आणि संजय राऊतांचं नाव घेतलं. मग राष्ट्रवादीला संजय राऊत हे नवाब मलिक यांच्यापेक्षा जास्त प्रिय झाले का? असा सवालही ओवैसी यांनी केलाय.
महाराष्ट्रातल्या सरकारला लोकशाहीत विश्वास असेल तर ते जेलमधील लोकांना सोडतील. जे नेते जेलमध्ये जातात त्यांची ताकद आणखी वाढते. खालीद गुड्डू सुटेल तेव्हा आणखी ताकदवान नेता होईल. अत्याचार कारणाऱ्यांनो लक्षात ठेवा, सत्ता फार काळ कुणाचीच नसते. आज तुम्ही सत्तेच्या नशेत आहात म्हणून अनेकांना जेलमध्ये टाकत आहात. मात्र अल्लाह त्यांनाच एकदिवस जेलमध्ये टाकतो. नवाब मलिक यांनाही सरकारने सोडले पाहिजे, अशी मागणीही ओवैसी यांनी यावेळी केलीय.