मुंबई: देवेंद्र फडणवीसांच्या (devendra fadnavis) नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. महाराष्ट्राचे भाजपचे (bjp) अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील राजकारणातला दिलेला पट… हे पाहता मला अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आठवला. तो देवेंद्रजींना चपखल लागू पडतो. तो तुम्हालाही माहीत आहे. तो डायलॉग म्हणजे, जहाँ हम खडे होते है, लाइन वही से शुरू होती है. देवेंद्रजी, तुम्ही जिथे उभे राहाल, लाइन तिथूनच सुरू होणार. महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट तुम्ही बदलला. कुणाच्या मनात कल्पना नव्हती, अशा स्वरुपाचं महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्रं महाराष्ट्र पाहतोय, अशा शब्दात भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुती सुमने उधळली. कार्यकर्त्यांना संबोधित करताना शेलार यांनी फडणवीसांचं मुक्तकंठाने कौतुक केलं.
माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात आज मुंबई भाजपाचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात नवनिर्वाचित मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, कँबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेले मंगलप्रभात लोढा यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. खासदार गोपाळ शेट्टी, पूनम महाजन, मनोज कोटक, आमदार प्रवीण दरेकर, अमित साटम, पराग अळवणी, तमिल सेल्वन, योगेश सागर, मनिषा चौधरी, माजी मंत्री प्रकाश महेता, राज पुरोहित, भाई गिरकर, माजी खासदार किरिट सोमय्या उपस्थित होते.
भाजपने मला पुन्हा एकदा मुंबईचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. मी तिसऱ्यांदा अध्यक्ष बनतोय. मी आज कार्यकर्त्यांचं मनापासून धन्यवाद देतो. पक्षाने आशिष शेलारला अध्यक्ष बनवलं नाही तर एका विचाराला, समस्येला, एका जागृतीला अध्यक्ष बनवल आहे, असं शेलार म्हणाले.
45 हजार कोटींचा अर्थसंकल्प असताना यांनी काय केलं मुंबईसाठी? 7 राज्याचा अर्थसंकल्प मुंबईपेक्षा कमी आहे. मणिपूर, मेघालय, मिझोराम, सिक्कीम, त्रिपुरा यांचं बजेट मुंबई महापालिकेच्या पेक्षा कमी आहे. पण सुविधा काय दिल्या हा आमचा सवाल आहे. मुंबईला मेट्रो देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईमध्ये 52 पुल नितीन गडकरी यांनी दिले. मुंबईला सुरक्षित करण्याचे काम गोपीनाथ मुंडे यांनी केले. मुंबईला बुलेट ट्रेनची कनेक्टिव्हिटी मोदी सरकारने दिली. कोस्टल रोडची परवानगी आणि मुहूर्तमेढ देवेंद्र फडणवीस सरकारने रोवली. मिठी नदीला स्वच्छ करण्यासाठी अर्धा निधी केंद्र सरकारने दिला. ब्रिमस्टोवड प्रकल्पासाठी अर्धे पैसे केंद्र सरकारने दिले. मुंबईतील हॉस्पिटलला निधी राज्य सरकार देते आहे. रेल्वेसाठी निधी नरेंद्र मोदी सरकारने दिला. मुंबईकरांना शिवसेनेने काय दिलं? भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार, असा हल्ला त्यांनी चढवला.
ही लढाई अधर्माच्या विरोधातील आहे. ही लढाई घराणेशाहीच्या विरोधातील आहे. एक कुटुंब 25 वर्षे चाललं. मुंबईकर टाहो फोडत आहे. आम्हाला लोकशाहीचे सरकार हवे आहे. महानगरपालिकेत मुंबईकरांना मुंबईकरांची सत्ता हवी आहे. मुंबईकरांची सत्ता देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात मिळेल. भारत नवभारत होत आहे. थोडसं महाभारत देखील बदलत आहे. कारण कौरव आणि पांडवामधील युद्ध अटळ होते तेव्हा भगवान श्री कृष्ण कर्णाला सांगायला गेले की, तू या युद्धाचा भाग बनू नको, कारण धर्म पांडवांच्या बाजूला आहे भगवान श्रीकृष्णाचे कर्णाने ऐकले नाही. आजचं महाभारत वेगळं आहे. देवेंद्र रुपी कृष्णाने एकनाथर रुपी कर्णाला बाजूला काढले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या या लढाईत कृष्णही आणि कर्णही आमच्या बाजूने आहे, असं ते म्हणाले.
महापालिकेतील लढाईत भारतीय जनता पक्षाचा महापौर आता कोणीही थांबवू शकत नाही. मुंबईत मुंबईकरांचं राज्य येण्याला कोणीही थांबवू शकत नाही. निवडणुकी पूर्वीच्या काळात कार्यकर्त्यांनी पायाला भिंगरी बांधून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे आवाहन आमदार शेलार यांनी केले. शिवसेनेने केलेल्या भ्रष्टाचाराचा पाढा वाचायचा आहे. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मुंबई जिंकायची आहे, असं ते म्हणाले.