नंदुरबार : राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच कराव लागेल, अशा शब्दात भाजप आमदार आशिष शेलार यांनी खास अहिराणी भाषेत महाविकास आघाडी सरकारवर टीका केलीय. आशिष शेलार आजपासून तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नंदुरबार जिल्हा दौऱ्यात संघटनात्मक आढावा घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. आज नंदुरबारमधील जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. एका अभद्र युतीतून कंत्राटावरचे कट कमिशनसाठी एकत्र आलेले हे तीन पक्षांचे ठाकरे सरकार आहे. जे गेल्या दोन वर्षात मंत्रालयात ही पोहचू शकले नाही. जे अजूनही मंत्रालयात पोहोचले नाहीत ते नंदुरबारसारख्या अतीदुर्गम भागात कधी आणि कसे पोहचणार? असा सवाल शेलार यांनी केलाय. (Ashish Shelar criticizes Mahavikas Aghadi government and ShivSena)
नंदुरबारमध्ये यावेळी पाऊस पुरेसा झालेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत आहे. 20 जुलैपर्यंत 3 लाख 5 हजार हेक्टरपैकी 1 लाख हेक्टरपर्यंत पेरणी झाली. मात्र, पावसानं दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. पीक कर्ज देण्यात बँकांनी आखडता हात घेतला आहे. 20 हजारापेक्षा जास्त खातेधारकांनी कर्ज घेतलेले नाही अशी अवस्था आहे. जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे नियोजन हे सरकार कधी करणार? असा प्रश्नही शेलार यांनी विचारलाय.
शेतीची, पाण्याची अडचण असताना पालकमंत्री गायब आहेत. आदिवांसींसाठी असलेल्या खावटी किटचे ते मिशन घेऊन आलेत. पण त्याची गुणवत्ता पाहिली तर प्रत्यक्षात खावटी किटचं “कट कमिशन” घेणे सुरु आहे, असा गंभीर आरोप शेलार यांनी केलाय. याबाबत भाजप आक्रमक पाऊल उचलेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिलाय.
पुरग्रस्तांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजबाबत विचारलं असता शेलार म्हणाले की, मी पॅकेज देणारा नाही तर मदत करणारा मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मग त्यांनी शब्द फिरवला का? याआधी तौक्ते आणि निसर्ग वादळावेळी घोषित केलेलं पॅकेज अद्याप जनतेपर्यंत पोहोचलं नाही. तातडीची 10 हजाराची मदत मिळालेली नाही. घोषित होत पण पोहोचत नाही, अस ठाकरे सरकारच पॅकेज असतं. या संकटाची व्याप्तीही अजून सरकारच्या लक्षात आलेली नाही. जनतेला मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे, असं शेलार म्हणाले.
कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना सूट द्या असं न्यायालय सांगत आहे. पण हे सरकार काय नियम लावतं त्याचा ताळमेळ नाही. मंदिरं बंद पण पब, बार सुरु अशी अवस्था आहे. प्रत्येकजण वेगवेगळी विधान करतात. सरकारच्या तीन पक्षांत बेदीली असल्याने एकवाक्यता नाही. सरकार जनतेबाबत गंभीर नसल्याची टीकाही शेलार यांनी केलीय.
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाला धक्का लावल्यास भाजप विरोध करेल. मात्र, हस्तांतरणाचा ठराव कॅबिनेटमध्ये कुणी मंजूर केला? ठाकरे सरकारनेच ना? मग बाहेर आंदोलन कशाला? ठरावाच्या वेळी नाव, अटी शर्ती याची काळजी का घेतली नाही? विरोध पण आपणच करायचा आणि समर्थनही द्यायचं, अशी शिवसेनेची टक्केवारीसाठी चाललेली आंदोलन आहेत, अशा शब्दांत शेलार यांनी शिवसेनेच्या आंदोलनावर जोरदार हल्ला चढवला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचा एक गड असलेल्या नंदुरबार जिल्हा कोअर कमिटी बैठक घेऊन संघटनात्मक आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री आमदार विजय गावीतजी, जिल्हा अध्यक्ष विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी आणि जिल्हापदाधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/FcM69346Zj
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 3, 2021
संबंधित बातम्या :
‘ती’ फाईल सोमवारी मिळाली, फाईल राज्यपालांच्या विचाराधीन, राजभवनचं स्पष्टीकरण
Ashish Shelar criticizes Mahavikas Aghadi government and ShivSena