मुंबई: भाजपने (bjp) वरळीच्या जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून शिवसेनेवर मात केली आहे. वरळीत शिवसेनेचे (shivsena) तीन आमदार आणि एक खासदार असूनही शिवसेनेला वरळीचं जांबोरी मैदान मिळवता आलेलं नाही. त्यामुळे शिवसेनेत अस्वस्थ निर्माण झाली आहे. त्यातही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात भाजपने घुसखोरी केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आज भाजपचे मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी काही सूचक विधाने केली आहेत. गड कुणाचा? कोणी ठरवलं? गड ठरवणं हे शेलार मामाशिवाय कोण ठरवू शकतं? आदित्य ठाकरे हे युतीत निवडून आले आहेत. त्यामुळे आम्ही गड मानत नाही. आम्ही मुंबईत 227 ठिकाणी दहीहंडी साजरा करत आहोत. जांबोरी मैदान तो झांकी है, पिक्चर अभी बाकी है, असा सूचक इशारा आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिल्याने त्यावर तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आशिष शेलार हे मीडियाशी संवाद साधत होते. वरळी हा शिवसेनेचा गड आहे हे आम्ही मानत नाही. आदित्य ठाकरे हे युतीतून निवडून आले आहेत. त्यामुळे गड वगैरे मानायचा प्रश्नच येत नाही. कुणाचा कोणता गड आहे हे शेलार मामांशिवाय कोण ठरवू शकतं? असं सांगतानाच जांबोरी मैदान तो झांकी है पिक्चर अभी बाकी है, असं आशिष शेलार म्हणाले.
यावेळी त्यांनी मोहित कंबोज यांच्या ट्विटबाबत विचारण्यात आलं. त्यावर मला त्याची माहिती नाही, असं त्यांनी सांगितलं. याबाबतची स्पष्टता सरकार देऊ शकतं. मोहित कंबोज यांचा ट्रॅकिंग रेट 100 टक्के आहे. ते माहिती शिवाय बोलत नाही. त्यांचे ट्विट गंभीर आहे. यावर मोहित कंबोजच त्यांचं म्हणणं स्पष्ट करतील, असं त्यांनी सांगितलं.
गड कुणाचा कोणी ठरवला? @AUThackeray वरळीतून निवडून आलेत त्यामध्ये भाजपाची पण मते आहेत… pic.twitter.com/sbyZ4GvT8t
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 17, 2022
यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्या भाषेवरही आक्षेप घेतला. या भाषेचा उपयोग करणाऱ्या आदित्य ठाकरे यांची भाषा अशोभनीय आहे. मदत देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घ्यायची आणि सत्तेसाठी पवारांच्या गोदीत बसायचे ही यांची नीती आहे, असा हल्ला त्यांनी चढवला.
1:- Anil Deshmukh
2:- Nawab Malik
3:- Sanjay Panday
4:- Sanjay Raut
5:- ____________अपना 100% Strike Rate Hai !
— Mohit Kamboj Bharatiya (@mohitbharatiya_) August 17, 2022
दरम्यान, जांबोरी मैदानात भाजपने दहीहंडी आयोजित केल्याने त्यावर शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांनी टीका केली आहे. भाजपचे वरळीतील दहीहंडीचे आयोजन हा बालिशपणा आहे. मैदानाची दुर्दशा होऊ नये म्हणून आम्ही तिथे नियोजन केलं नाही. जांबोरी मैदानासाठी पालिकेने अडीच कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे मैदानाची वाताहात होऊ नये ही आमची भूमिका होती. आम्ही दहीहंडी साजरी करणार आहोत. पण दुसरं मैदान शोधत आहोत, असं सांगतानाच वरळीशी शिवसेनेचे घट्टं नातं आहे. गोविंदा असो किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून प्रयत्न केले तरी वरळी शिवसेनेपासून तुटणार नाही. सध्या भाजपचे सुरू असलेले दहीहंडी आयोजनाचे प्रयत्न बालिश आहेत, असा टोला सुनील शिंदे यांनी लगावला.