‘ममता बॅनर्जींनी काँग्रेस विसर्जित केली का? काँग्रेसला हे मान्य आहे का?’ यूपीएच्या मुद्द्यावरुन आशिष शेलारांचा खोचक सवाल
यूपीएबाबत विचारलेल्या प्रश्नावर कुठे आहे यूपीए? आता यूपीए नाहीये. यूपीए काय आहे? असा प्रतिसवाल ममता यांनी केला. ममतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत आशिष शेलार यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावलाय. तसंच ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिलं आहे.
मुंबई : पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. पवारांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर ही बैठक पार पडली. या बैठकीत भाजपविरोधात तिसरा पर्याय देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषदेत दिली. इतकंच नाही तर यूपीएबाबत विचारलेल्या प्रश्नावर कुठे आहे यूपीए? आता यूपीए नाहीये. यूपीए काय आहे? असा प्रतिसवाल ममता यांनी केला. ममतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत आशिष शेलार यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावलाय. तसंच ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिलं आहे.
शरद पवांच्या उपस्थित ममता बॅनर्जी म्हणाल्या की यूपीए संपली, याचा काँग्रेसनं विचार करायला हवा का? असा सवालही आशिष शेलार यांना करण्यात आला. त्यावेळी काँग्रेसला बुद्धी असेल तर त्यांनी विचार करावा. याचं कारण काँग्रेसला स्वत:च्या अस्तित्वाबद्दलच उभं राहिलं पाहिजे याबद्दलचा प्रश्न मनात पडत असेल तर ते जनतेसमोर काय मांडणार? अशी खोचक टीका शेलार यांनी काँग्रेसवर केलीय.
‘लोकशाहीत निवडणुका येतील तेव्हा नक्की या’
त्याचबरोबर ‘जे स्वत: पराभूत आणि नकारात्मक वृत्तीमध्ये आहेत. त्यांनी भाजपला पराभूत करण्याच्या भूमिकेवर चर्चा करु नये. जे दुबळे आहेत, कमजोर आहेत, त्यांनी दुसऱ्याच्या विरोधात लढण्यामध्ये फुशारकी मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. लोकशाहीत निवडणुका येतील तेव्हा नक्की या, एकटे या नका येऊ. मुळामध्ये यूपीए संपली म्हणजे ममता बॅनर्जी यांनी काय काँग्रेस विसर्जित केली आहे का? काँग्रेसला हे मान्य आहे का? आणि काँग्रेसविरोधात अशी घेतलेली भूमिका ही शिवसेनेच्या समर्थनावर घेतली आहे का? या सगळ्या गोष्टींचा उलगडा त्यांना करावा लागणार आहे.
या गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना? @BJP4Maharashtra @ChDadaPatil @Dev_Fadnavis pic.twitter.com/iq2R581tRz
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 1, 2021
शरद पवारांची सावध आणि सूचक प्रतिक्रिया
देशात काँग्रेसला वगळून भाजपविरोधात तिसरा पर्याय निर्माण केला जाणार का? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी अत्यंत सावधगिरीने उत्तर दिलं. ‘कुणाला वगळ्याची बात नाही. सगळ्यांना बरोबर घेऊन जायची बात आहे. त्यामुळे जो मेहनत करतोय आणि सगळ्यांसोबत येण्यासाठी तयार आहे, त्या सगळ्यांच्या सह’, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.
‘नेतृत्वाचा विषय नाही, एक सक्षम पर्याय द्यायचा आहे’
शरद पवार सर्वात सिनियर नेते आहेत, आता शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं काय? असा प्रश्न ममता बॅनर्जी यांना विचारण्यात आला. त्यावेळी अरे काय यूपीए, आता कोणतीही यूपीए नाही. आम्ही सर्व बसून ठरवू, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. त्यावेळी ममता बॅनर्जी यांना मध्ये तोडत, शरद पवार म्हणाले की, इथे नेतृत्वाचा विषय नाही. एक स्ट्राँग अल्टरनेटिव्ह, ज्यांच्यावर या देशातील जनतेचा विश्वास असेल. भाजपला दूर करण्यासाठी मदतगार होईल, त्या रस्त्याने आम्ही जाऊ, असंही पवार यांनी स्पष्ट केलं आहे.
इतर बातम्या :