भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात कधी? ‘या’ जिल्ह्यात 5 दिवस, वाचा काय अपडेट्स?
उद्या म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी भारत जोडो यात्रा तेलंगणात प्रवेश करेल. त्यानंतर ही यात्रा महाराष्ट्राच्या दिशेने कूच करेल.
नांदेडः काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरु केलेली भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रात कधी येतेय, याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली. येत्या ७ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी सर्व पदाधिकाऱ्यांसोबत महाराष्ट्रात दाखल होतील. नांदेडमध्ये ही यात्रा पोहोचेल, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
नांदेड जिल्ह्यात राहुल गांधी यांचा पाच दिवस दौरा असेल. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 9 नोव्हेंबर रोजी यात्रेत सहभागी होतील. तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेदेखील यात्रेत सहभागी होणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली.
7 सप्टेंबरला राहुल गांधी यांनी तमिळनाडू येथून भारत जोडो यात्रेला सुरुवात केली. 150 दिवसांची ही यात्रा श्रीनगरमध्ये समाप्त होणार आहे.
भारत जोडो यात्रेद्वारे राहुल गांधी तब्बल 3 हजार 570 किलोमीटरचा प्रवास करत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील नेते यात्रेत सहभागी होणार असल्याने राजकीय वर्तुळाचं लक्ष याकडे लागलंय.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची बळकटी यात्रेच्या निमित्ताने दिसून येईल.
उद्या म्हणजेच 23 ऑक्टोबर रोजी भारत जोडो यात्रा तेलंगणात प्रवेश करेल. त्यानंतर ही यात्रा महाराष्ट्राच्या दिशेने निघेल.
महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत सहभागी होण्याच्या वृत्तावरून भाजपने जोरदार टीका केली आहे.
उद्धव ठाकरे कधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून रस्त्यावर उतरले नाहीत, रामजन्मभूमी आंदोलनातही दिसले नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचा आदरयुक्त दबदबा आता रसातळाला गेलाय. त्यांना रामाऐवजी राहुलची आरती आवडतेय… अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.