देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण नासवलं; प्रसिद्ध वकिलाचा गंभीर आरोप
एकनाथ शिंदे यांनी नवीन बेकायदेशीर बाराखडी सुरू केली आहे. याच सगळ्या गोष्टींवर काम करत करत अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदावर स्थानापन्न झाले आहेत. हे अत्यंत चुकीच आणि बेकादेशीर आणि घटनाबाह्य आहे.
इंदापूर : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केल्याने राज्यातील समीकरणे बदलली आहेत. राज्यात आता शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. अजित पवार यांचं बंड कायदेशीर आहे की बेकायदेशीर यावर आता चर्चा सुरू झाली आहे. तसेच या बंडावरून भाजपवरही टीका होऊ लागली आहे. एका प्रसिद्ध वकिलाने तर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारण नासवल्याचा गंभीर आरोप केला आहे.
प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली आहे. सध्या जे राजकारण सुरू आहे ते असंवैधानिकदृष्ट्या सुरू आहे. हे अतिशय चुकीच आहे असं माझं स्पष्ट मत आहे. घटनेच्या चौकटीत न बसणाऱ्या गोष्टी करणं म्हणजे जर चाणक्य नीति असेल तर ही चाणक्य नीति मतदारांच्याविरुद्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी या गोष्टीला नकार दिला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सगळे राजकारण नासवलेलं आहे. अत्यंत विद्रूप राजकीय चेहरा म्हणून ते पुढे आलेले आहेत, अशी टीका असीम सरोदे यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मिळून घटनाबाह्य सरकार स्थापन केलं. या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा विलंब झाल्यामुळे हे सरकार अस्तित्वात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत नसल्याने हे सरकार अस्तित्वात आहे. काही दिवसातच एकनाथ शिंदेंसह त्यांचे मंत्री आणि त्यांचे आमदार अपात्र ठरविण्यात येतील, असा दावा सरोदे यांनी केला.
सत्ताकांक्षा असणं वेगळं
एकनाथ शिंदे यांचे डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी अजितदादांना अशा पद्धतीने पक्षासोबत घेण्यात आलं आहे, अस दिसून येत. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली काम न करण्यासाठी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं. त्यांना बगल देऊन आता ते स्वतः उपमुख्यमंत्री झालेले आहेत. सत्ताकांक्षा ही फार महत्त्वाची असते आणि ही प्रत्येक माणसांमध्ये असते. सत्ताकांक्षा असणं ही वेगळी गोष्ट आहे. मात्र सत्तापिपासू असणं ही वेगळी गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.
मतदारांनीच नकार द्यावा
आता मतदारांनीच अशा राजकीय नेत्यांना नकार देणे शिकले पाहिजे. त्यामुळे एकनाथ शिंदेंसह अजित पवारपर्यंत अपात्र असलेले हे नेते आहेत. त्यांनी राज्यात असंवैधानिक प्रकार करत सरकार स्थापन करण्यास सुरुवात केली. सध्या शरद पवार यांच्या बाजूने संविधान आहे. त्यांच्या बाजूने कायदेशीरता आहे. ते पक्षाचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेले प्रतोद त्यांनी नियुक्त केलेले प्रदेशाध्यक्ष यांनाच महत्त्व आहे, असंही त्यांनी सांगितलं.
लोकशाहीसाठी घातक
शरद पवार आणि अजित पवार यांचे जे काही भांडण आहे तो त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. यावर एक नागरिक म्हणून एक मतदार म्हणून याचं मला काही घेणं देणं नाही. परंतु कायदेशीर दृष्टिकोनातून पाहता केवळ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे एकीकडे पालन होत नाही आणि हा पायंडा यशस्वी झालेला आहे. एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून अजित पवारांनी तशाच प्रकारे घटनाबाह्य सरकार स्थापन केलं आहे हे लोकशाहीसाठी घातक आहे, असंही ते म्हणाले.