Assembly Election 2023 | भाजपच्या विजयानंतर दिल्लीत हालचाली वाढल्या, भाजप मुख्यालयात महत्त्वाची बैठक
Assembly Election 2023 | विधान सभा निवडणुकीत चार पैकी तीन राज्यांत भाजपची सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले. या निकालानंतर नवी दिल्लीत घडामोडी वाढल्या आहेत. भाजपने आजच महत्वाची बैठक बोलवली आहे. त्यात तीन राज्यांतील मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
प्रदीप कापसे, नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा आज पार पडला. पाच पैकी चार राज्यांतील मतमोजणी रविवारी झाली. या निवडणुकीत चार पैकी तीन राज्यांत भाजपची सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसकडे असणारी राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांत भाजपचे पुनरागमन झाले आहे. तसेच काँग्रेसला केसीआरकडे यांच्याकडे असलेले तेलंगणा राज्यात सत्ता मिळाली आहे. या सर्व निकालानंतर दिल्लीत काँग्रेसच्या कार्यालयात शांतता पसरली तर भाजप कार्यालयात जल्लोष सुरु झाला आहे. त्यानंतर वरिष्ठ पातळीवर भाजपमध्ये हालचाली वाढल्या आहेत. भाजपने आजच महत्वाची बैठक बोलवली आहे.
भाजपने बोलवली आज बैठक
भारतीय जनता पक्षाच्या नवी दिल्लीतील कार्यालयात जल्लोष सुरु आहे. भाजप मुख्यालयाच्या बाहेर दुपारपासूनच भाजप कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. भाजपने आजच महत्वाची बैठक बोलवली आहे. या बैठकीत तीन राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी ७ वाजता भाजप मुख्यालयात पोहोचणार आहे. यावेळी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानच्या जनतेचे आभार मानणार आहे, असे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी म्हटले आहे.
राजस्थानमध्ये विजय पण हा धक्का
भाजपला राजस्थानमध्ये विजय मिळत आहे. १९९ पैकी ११२ जागेवर आघाडी घेऊन भाजप सत्तेकडे वाटचाल करत आहे. या निवडणुकीत भाजपने आपल्या सात खासदारांना विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवले होते. परंतु या सात पैकी 4 खासदार पिछाडीवर आहेत. झोटवाड येथून राज्यवर्धन राठौड, किशनगडमधून भागीरथ चौधरी, सांचोर येथून देवजी पटेल तर मंडावा येथून नरेंद्र कुमार पिछाडीवर आहेत.
दिल्लीप्रमाणे मुंबईत जल्लोष
मुंबई भाजप प्रदेश कार्यालय बाहेर मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे. भाजपचे नेते मुंबई कार्यालयात येत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केला जात आहे. मुंबईसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात गेले पदाधिकारी आणि कार्यकर्ते मुंबईत येण्यास सुरुवात झाली आहे.