प्रयत्न तर वाझेने पण केले होते, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले वाझे म्हणजे….; वेदांतावरून भातखळकरांचा पुन्हा शिवसेनेला खोचक टोला
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर वेदांता प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेवरून भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
मुंबई : सध्या वेदांतावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. वेदांता प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला हलवण्यात आल्याने, आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर वेदांता प्रकल्प गुजरातला दिल्याचा आरोप केला जात आहे. तर वीस दिवसांमध्ये एवढा मोठा प्रकल्प दुसरीकडे कसा जाऊ शकतो? असे म्हणत सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांवर टीका केली जात आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये महाविकास आघाडी सरकारने प्रकल्पासाठी वेळ न दिल्यानेच तो राज्याबाहेर गेल्याचा आरोप भाजप (BJP), शिंदे (Eknath Shinde) गटाच्या वतीने करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अखेर प्रतिक्रिया दिली आहे. प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मविआ सरकारने खूप प्रयत्न केले, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं. त्यावरू आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.
भातखळकर नेमकं काय म्हणाले?
प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मविआ सरकारने खूप प्रयत्न केल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मविआ सरकारने खूप प्रयत्न केले : उद्धव ठाकरे यांची वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादावर प्रतिक्रिया. प्रयत्न वाझेने पण केले होते. बंगला शोधण्याचे? खाली जिलेटिनवाली गाडी उभी करण्याचे. तोच वाझे जो लादेन नाही, असे निर्भिड मत उद्धवजींनी व्यक्त केले होते’. असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे.
प्रकल्प राज्यात आणण्यासाठी मविआ सरकारने खूप प्रयत्न केले : उद्धव ठाकरे यांची वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या वादावर प्रतिक्रिया.
प्रयत्न वाझेने पण केले होते. बंगला शोधण्याचे? खाली जिलेटिनवाली गाड़ी उभी करण्याचे. तोच वाझे जो लादेन नाही, असे निर्भिड मत उद्धव जीनी व्यक्त केले होते. pic.twitter.com/fu8hJve0C3
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 17, 2022
चित्रा वाघ यांची टीका
दरम्यान दुसरीकडे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी देखील उद्धव ठाकरेंनी वेदांतांवर दिलेल्या प्रतिक्रेवरून निशाणा साधाला आहे. ‘मविआ काळात हा प्रकल्प राज्यात येणार होता असे उद्धवजी म्हणतायत म्हणजे आलेला नव्हता हे मान्य करतायत … म्हणजे जो आलाच नाही..तो प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला, असा यांचा दावा आहे…’ असं ट्विट चित्रा वाघ यांनी केलं आहे.