Aurangabad | शिंदे गट की शिवसेना, औरंगाबादच्या जनतेचा कौल काय? 16 ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र काही तासांत…
आमदार संजय शिरसाट यांचे मागील दीड दशकांपासून या वडगाव कोल्हाटी-बजाजनगर या ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच संजय शिरसाट यांनी बंड पुकारले.
औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यातून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे जाणाऱ्या आमदारांची संख्या लक्षणीय आहे. शिवसैनिकांमध्ये (Shivsainik) शिवसेना आणि शिंदे सेना अशी उभी फूट पडलेली दिसून येतेय. मात्र निवडून दिलेल्या आमदारांनी (Shivsena MLA) गट बदलल्यामुळे जनता नाराज आहे, असा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात येतोय. शिंदेंच्या बंडानंतर प्रथमच औरंगाबादध्ये निवडणूक झाली असून 16 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान घेण्यात आलं. या ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून पुढील काही तासात निवडणुकीचे निकाल हाती येतील. त्यानंतर औरंगाबादमधील विशेषतः ग्रामीण भागातील जनता कुणाच्या बाजूने आहे, याचा कौल कळेल.
16 ग्रामपंचायतींसाठी मतदान
वाळूज औद्योगिक परिसराला लागून असलेल्या वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान पार पडले. आता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. वडगाव कोल्हाटीत 60% मतदान झाले. एकूण 37 हजार 520 पैकी 22 हजार 527 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 6 वॉर्डांतील 72 उमेदवारांचं भवितव्य आज कळणार आहे.
शिरसाटांची प्रतिष्ठा पणाला
आमदार संजय शिरसाट यांचे मागील दीड दशकांपासून या वडगाव कोल्हाटी-बजाजनगर या ग्रामपंचायतीवर वर्चस्व आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच संजय शिरसाट यांनी बंड पुकारले. शिवसेनेत उभी फूट पडली. त्यामुळे येथील ग्रामपंचायतीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट गट, भाजप आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रमेश गायकवाड यांनी त्यांचे पॅनल उतरवले होते. प्रचारासाठी भाजप आणि शिवसेनेनेही जोर लावला होता. भाजपचे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, माजी महापौर बापू घडामोडे, राजू शिंदे यांच्यासह मूळ शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, नंदकुमार घोडेले यांनीही जोरदार प्रचार केला होता. एकूणच आजच्या निवडणुकांच्या निकालानंतर जनतेचा कौल कोणत्या शिवसेनेकडे आहे, हे स्पष्ट होईल.
दोन ठिकाणी मतदानात गोंधळ
गुरुवारी मतदान प्रक्रिया सुरु असताना दोन ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि माजी महापौर नंदकुमार घोडेले हे हायटेक महाविद्यालयासमोरील मतदान केंद्रावर आले होते. येथून परत जात असताना आमदार शिरसाट गटाचे तालुकाप्रमुख हनुमान भोंडवे यांनी खैरे यांचे चरणस्पर्श केले. यावेळी खैरेंनी भोंडवे यांना गद्दार म्हणून हिणवले. त्यानंतर भोंडवे यांनीही खैरेंना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. वडगाव येथील मतदान केंद्रावर भाजप उमेदवार अमित चोरडिया यांनी मतदान केंद्रात ठिय्या दिला. विरोधी उमेदवार शरद पवार यांनी यास आक्षेप घेतल्याने काही काळ गोंधळ झाला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद निवळला.