औरंगाबादः शिवसेनेशी, पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. या गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी पक्षातील शिवसैनिकांकडूनच होत आहे. पक्षातीलच नेत्यांविरुद्ध आंदोलन करण्याची नामुष्की शिवसैनिकांवर ओढवल्याची विदारक चित्र आज महाराष्ट्रातील शिवसेनेत (Shiv Sena) दिसून येतंय. औरंगाबादमधील शिवसेना (Aurangabad Shiv Sena) नेत्यांनी याचसाठी आज मोठं आंदोलन केलं आहे. अशा प्रकारे शिवसैनिकांनी केलेलं हे राज्यातील पहिलंच आंदोलन असल्याचा दावा शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. औरंगाबादमधील क्रांती चौकात शहरातील शिवसैनिकांनी हे आंदोलन केलं आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा गड समजल्या जाणाऱ्या औरंगाबदमध्येच हे आंदोलन सुरु आहे.
औरंगाबादच्या क्रांती चौकात मोठ्या प्रमाणावर आज महिला शिवसैनिक जमले होते. शिवसेनेत सुरु असलेल्या घडामोडींवर त्यांनी अत्यंत भावनिक आणि उद्वेगाने प्रतिक्रिया दिली. शिवसेनेतील बंडखोरांविरोधात आंदोलन करण्याची वेळ यावी, हीच अत्यंत दुर्वैवी बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मतदारांनी अत्यंत निष्ठेनं यांना मतदान केलं आहे. पण आमदारांनी त्यांची निष्ठा विकली. या गद्दारांचा आम्ही आमच्या भाषेत निषेध व्यक्त करतोय. त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली जावी. शिवसेनेप्रती त्यांनी आपला नालायकपणा सिद्ध केला आहे, अशी तीव्र शब्दात प्रतिक्रिया जिल्हा शिवसेना संघटन महिला आघाडीच्या नेत्या प्रतिभा जगताप यांनी दिली.
औरंगाबाद शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी कालच या आंदोलनाची घोषणा केली होती. मात्र हे आंदोलन करू नये, असा फोन एकनाथ शिंदे यांनी अंबादास दानवे यांना केला होता, असा दावा दानवेंनी केला आहे. मात्र शिवसैनिकांची ही भावना असून आम्ही ती आंदोलनातून व्यक्त करणार, असं दानवेंनी सांगितलं.
दरम्यान, महाविकास आघाडीतील घमासानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अत्यंत बोलकं ट्वीट केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभा बरखास्तीच्या दिशेने सुरु आहे… असं वक्तव्य त्यांनी ट्वीटमधून केलंय. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयारी केल्याचं शिवसेनेनंही मान्य केल्याचं दिसून येतंय.