Aurangabad | औरंगाबादेत फितुरांच्याच मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा दौरा, शिवसेनेला पडलेली भगदाडं बुजणार का?
बंडखोर आमदारांमुळे महिनाभरात जिल्ह्यातील शिवसेनेतील असंख्य पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या गटात शामिल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे औरंगाबादमधील शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल करण्याचे आव्हान ठाकरेंसमोर आहे.
औरंगाबादः शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद शिवसेनेतून (Aurangabad Shivsena) एकाच वेळी पाच आमदारांनी बंडखोरी केल्याने पक्षात मोठी दुही निर्माण झाली आहे. संजय शिरसाट, संदिपान भूमरे, अब्दुल सत्तार, रमेश बोरनारे आणि प्रदीप जैस्वाल यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्हाभरातील शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. राज्यभरातील शिवसेनेत अशीच स्थिती असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) नेतृत्वात शिवसेनेनं मोठी डॅमेज कंट्रोलची मोहीम हाती घेतली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील बंडखोरी तर अधिक जिव्हारी लागल्यामुळे बंडखोरांच्या मतदारसंघात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा दोन दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे. 22 आणि 23 जुलै रोजी आदित्य ठाकरे औरंगाबादेत असून त्यांच्या शिवसंवाद यात्रेला जिल्ह्यातून कसा प्रतिसाद मिळतोय, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. वैजापूर, बिडकीन, औरंगाबाद मध्य आणि पश्चिम मतदारसंघात ही यात्रा काढण्यात येणार आहे.
दानवे, खैरे तयारीत, नगरसेवकांची स्थिती काय?
आदित्य ठाकरेंच्या औरंगाबाद दौर्यानिमिचत्तम जिल्हा प्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. माजी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, जिल्हा युवाधिकारी हनुमान शिंदे यांच्यासह माजी नगरसेवक, शहरप्रमुख, उपशहरप्रमुख व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीला चार ते पाच माजी नगरसेवकांनी दांडी मारली होती. 21 जूनपासूनच औरंगाबाद शिवसेनेत बंडखोरी सुरु झाली आहे. तेव्हापासून बंडखोर आमदारांमुळे आजपर्यंत जिल्ह्यातील शिवसेनेतील असंख्य पदाधिकारी एकनाथ शिंदेंच्या गटात शामिल होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे औरंगाबादमधील शिवसेनेचे डॅमेज कंट्रोल करण्याचे आव्हान ठाकरेंसमोर आहे.
आदित्य ठाकरेंचा दौरा कसा?
- औरंगाबादमध्ये 22 जुलैला आदित्य ठाकरे येतील. दुपारी 1 वाजता वैजापूर, 4 वाजता खुसताबाद आणि 6 वाजता औरंगाबाद शहरातील संत एकनाथ रंगमंदिरात मेळावा घेतली.
- 23 जुलै रोजी सकाळी 10 वाजता बिडकीन येथे तर 11.30 वाजता गंगापूर मतदार संघात शिवसंवाद यात्रा काढली जाईल.
बंडखोरांच्या मतदारसंघातच मेळावे
औरंगाबाद जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला ऐतिहासिक यश मिळाले होते. शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले होते. मात्र एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर पाच आमदार शिंदेगटात गेले तर उद्धव ठाकरेंच्या गटात फक्त एकच आमदार राहिले. त्यामुळेच आता बंडखोर आमदारांच्या मतदारसंघातच आदित्य ठाकरेंचे मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील शिवसंवाद यात्रेची तयारी पूर्ण ताकतीने सुरु असल्याचे जिल्हा युवा अधिकारी हनुमान शिंदे यांनी सांगितले.