Shivsena | विधान परिषदेत शिवसेनेचा विरोधी पक्ष नेता ठरला? औरंगाबादचा गड राखणारे कोण आहेत अंबादास दानवे?
औरंगाबादचा विचार करता शिंदे गटात गेलेल्या पाच आमदारांना लाभाची पदं मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपचे दोन मंत्रीदेखील मराठवाड्यात आहेत. त्यामुळे येथील आमदाराला विरोधी पक्षनेते पद दिल्यास मराठवाड्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकून राहिल, अशी आशा शिवसेनेला आहे.
औरंगाबादः महाराष्ट्रातल्या नव्या सरकारमध्ये मंत्रिपदी कुणाची वर्णी लागतेय, याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. तर इकडे विधान उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) शिवसेनेत विधान परिषदेचं (MLC) विरोधी पक्षनेते पद कुणाकडे जाणार याचेही आडाखे बांधले जात आहेत. भाजपनंतर शिवसेनेचंच संख्याबळ जास्त असल्याने विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद शिवसेनेकडेच असेल, असा दावा उद्धव ठाकरेंच्या वतीने करण्यात आला आहे. तसे निवेदनही देण्यात आले आहे. आता फक्त या पदावर शिवसेनेच्या कोणत्या आमदाराची वर्णी लागतेय, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मुंबईतील सचिन अहिर, अनिल परब या दोघांची नावं आधी चर्चेत होती. मात्र मागील काही दिवसांतील घडामोडी पाहता औरंगाबादचे आमदार अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची या पदावर वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे.
ढासळता बुरूज वाचवण्याचं इनाम?
औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. मात्र याच ठिकाणाहून तब्बल पाच आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात शामिल झाले. सुरुवातीला सहावे आमदार उदयसिंह राजपूत हेदेखील शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा होती. मात्र त्यांना उद्धव ठाकरेंच्या गटातच रोखून ठेवण्याची मोठी जबाबदारी अंबादास दानवेंनी पार पाडल्याचं सांगितलं जातंय. उदयसिंह राजपूत हेदेखील शिंदे गटात गेले असते तर औरंगाबादमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही आमदार उरला नसता. त्यामुळे शिवसेनेचा ढासळता बुरूज राखल्यामुळे विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद औरंगाबादचे विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे यांना देण्यावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
कोण आहेत अंबादास दानवे?
अंबादास दानवे हे औरंगाबाद शिवसेना जिल्हाप्रमुख आणि राज्य पातळीवरील शिवसेनेचे प्रवक्ते आहेत. 30 जून 2019 रोजी ते स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेले. 29 ऑगस्ट 2025 पर्यंत त्यांचा विधान परिषदेवरील कार्यकाळ आहे. औरंगाबादेत शहराचं नामांतर असो वा विमातनळाचं नामांतर किंवा शिवसेनेच्या अजेंड्यावरील इतर मुद्द्यांवर अंबादास दानवे यांनी नेहमीच आक्रमक भूमिका मांडली आहे. अनेकदा त्यांनी विरोधकांवर कडाडून टीकाही केली आहे. त्यातच आता शिवसेनेतील बंडानंतर औरंगाबादची खिंड लढवण्याची मोठी जबाबदारी त्यांनी पार पाडल्याची चर्चा आहे.
शिवसेनेची दूरदृष्टी काय?
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था विशेषतः महापालिका निवडणुका लक्षात घेता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा जोमाने कामाला लागावं लागणार आहे. शिवसेनेच्या वतीने पक्ष संघटन वाढवण्यासाठी मोठी मोहीमही हाती घेण्यात आली आहे. औरंगाबादचा विचार करता शिंदे गटात गेलेल्या पाच आमदारांना लाभाची पदं मिळण्याची शक्यता आहे. तसेच भाजपचे दोन मंत्रीदेखील मराठवाड्यात आहेत. त्यामुळे येथील आमदाराला विरोधी पक्षनेते पद दिल्यास मराठवाड्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साह टिकून राहिल, अशी आशा शिवसेनेला आहे. या कारणासाठीही अंबादास दानवेंकडे विरोधीपक्ष नेते पद दिले जाईल, असे म्हटले जात आहे.