मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे. मात्र, “खडसे हे भाजपचे महत्त्वाचे नेते आहेत. ते पक्ष सोडणार नाहीत, अशी मला आशा आहे. भाजपचे राज्यातील आणि केंद्रातील नेते त्यांची समजूत काढतील”, अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे (Babanrao lonikar on Eknath Khadse BJP party resignation).
“एकनाथ खडसे यांनी राजीनामा दिला की नाही दिला हे मला माहिती नाही. मी कार्यक्रमात आहे. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आहेत. मला पत्रकारांच्या माध्यमातूनच याबाबत माहिती मिळाली. मी गेल्या 20 वर्षांपासून एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपमध्ये काम करत आहे. अनेक कार्यक्रमांसाठी ते परतूरला आलेले आहेत. भाजपचे ते महत्त्वाचे नेते आहेत. मला आशा आहे की, खडसे भाजप सोडणार नाहीत”, असं बबनराव लोणीकर म्हणाले.
“भाजप पक्षाचे राज्यातील आणि केंद्रातील नेते एकनाथ खडसे यांची समजूत काढतील. खडसे पक्ष सोडणार नाहीत, असा मला विश्वास आहे. कारण गेली 30 वर्ष मी त्यांच्यासोबत काम केलं आहे”, असं बबनराव म्हणाले (Babanrao lonikar on Eknath Khadse BJP party resignation).
“बॅनर लागणं, टीव्हीवर बातम्या येणं, याचं वारंवार खडसेंनी खंडन केलं आहे. मी पक्षातच राहणार, असं खडसेंनी सांगितलं आहे. आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की, खडसे साहेब पक्ष सोडणार नाहीत”, असं लोणीकर ठामपणे म्हणाले.
एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द
1980 मध्ये खडसे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, 1987 मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (1989 – 2019) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.
संबंधित बातम्या:
एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होईल, राष्ट्रवादीला बळ मिळेल : जयंत पाटील
खडसेंनी राजीनामा दिला, शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार; जयंत पाटलांची अधिकृत घोषणा
EXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत प्रवेश!