नवनीत राणा यांचा पराभव केल्यानंतर बच्चू कडू यांची मोठी घोषणा; महायुती, रवी राणा यांचं टेन्शन वाढणार
आमचा उमेदवार असता किंवा नसता याला काही अर्थ नाही. तुम्ही पाच वर्षात काय काम केलं ते आधी सांगा. कधी काम केलं नाही. लोकांच्या प्रश्नांना हात घातला नाही. अन् पराभूत झाल्यावर त्याचं खापर दुसऱ्यावर फोडायचं हे काही बरोबर नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी अमरावतीत नवनीत राणा यांच्याविरोधात उमेदवार दिला. त्यामुळे नवनीत राणा यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला आहे. बच्चू कडू हे महायुतीचे घटक आहेत. असं असतानाही त्यांनी राणा यांचा पराभव घडून आणल्याने महायुतीत एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर बच्चू कडू यांनी आता एक मोठा निर्णय जाहीर केला आहे. बच्चू कडू यांचं हा निर्णय महायुतीचं टेन्शन वाढवणारा आहे. त्यामुळे महायुतीचे नेते बच्चू कडू यांचं मन वळवण्यात यशस्वी होतात का हे पाहावं लागणार आहे.
बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना हा निर्णय जाहीर केला आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत आम्ही 20 ते 25 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. अमरावती जिल्ह्यात उमेदवार देणारच आहोत. पण राज्यात इतर ठिकाणीही उमेदवार देणार आहोत. यासिवाय बडनेरा विधानसभा मतदारसंघातही उमेदवार देणार आहोत, अशी घोषणा बच्चू कडू यांनी केली आहे. रवी राणा हे बडनेरा विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याचा निर्णय बच्चू कडू यांनी घेतल्याने रवी राणा आणि महायुतीचं टेन्शन वाढणार आहे.
रवी राणांची भाषा योग्य नव्हती
खासदार बळवंत वानखडे हे बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे त्यांचं मी अभिनंदन केलं आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्र बाबत न्यायालयाने चुकीचा निर्णय दिला. ही निवडणूक धर्मावर झाली. आम्ही शेतकऱ्यांच्या मुद्दावर निवडणूक लढलो. आमच्याच उमेदवारीमुळे नवनीत राणा पराभूत झाल्या यात फार तथ्यही नाही. भाजपने उमेदवारीला विरोध केला तरी उमेदवारी दिली त्यात रवी राणाची भाषा योग्य नव्हती. रवी राणा हे आम्हाला घरी येऊन मारण्याच्या धमक्या देतात आणि त्यांचं काम आम्ही करायचं का? एवढं अपमानित होऊन आम्हाला जगता येत नाही, असं बच्चू कडू म्हणाले.
बैठकीचं निमंत्रण कसे देतील?
बच्चू कडू यांनी पराभव केला आहे असं वाटत असेल तर आपण कसे वागलो याच विचार करावा, असा सल्लाही बच्चू कडू यांनी रवी राणा आणि नवनीत राणा यांना दिला. अमरावतीचा उमेदवार आम्ही पाडला असं ते म्हणत आहेत. मग ते आम्हाला एनडीएच्या बैठकीचे निमंत्रण कशी देतील?, असा सवाल त्यांनी केला.