अमरावती: खोक्याच्या मुद्द्यावरून शिंदे समर्थक आमदार बच्चू कडू (bacchu kadu) आणि भाजप समर्थक आमदार रवी राणा (ravi rana) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. या मुद्द्यावरून बच्चू कडू यांनी बाप दाखव नाही तर श्राद्ध कर अशी अवस्था रवी राणा यांची केली आहे. एका बापाची औलाद असाल तर पुरावे द्या. आम्ही पैसे घेतल्याचे पुरावे 1 तारखेपर्यंत द्या. पुरावे दिले तर आम्ही तुमच्या घरी भांडी घासू. पण पुरावे नाही दिले तर आम्ही सात ते आठ आमदार वेगळा निर्णय घेऊ, असा संतप्त इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे. तसेच या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.
बच्चू कडू यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे. कुणावर आरोप करताना अशा पद्धतीने आरोप करून त्याचं अस्तित्वच पणाला लावणं हे फार चुकीचं आहे. म्हणून आम्ही पुरावे मागत आहोत. 1 तारखेपर्यंत राणांनी पुरावे द्यावेत. एका बापाची औलाद असेल तर तो पुरावे देईल. पुरावे दिले तर त्यांच्या घरी भांडी घासू. त्यांनी आरोप केल्यानंतर सात ते आठ आमदारांचा मला फोन येऊन गेला. अशा प्रकारे प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करू नये. या प्रकरणावर व्यवस्थित पावलं उचलली नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
गुवाहाटीला मीच नाही तर 50 आमदार गेलो होतो. आमच्यावर आरोप करून आमच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करण्याचा हा प्रकार आहे. याची दखल माझ्या आधी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवी. तुमच्यासोबत येणं चुकीचं ठरत असेल आणि तुमच्याच फळीतील आमदार आमच्यावर आरोप करत असेल तर ही आमच्यासाठी मोठी दुर्देवी गोष्ट आहे. मलाच नव्हे तर तो शिंदे-फडणवीसांवरही हे आरोप आहेत. रवी राणांचे आरोप हे आमच्यावरच नाही तर सर्वांवर आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी किती पैसे दिले हे लोकं विचारतील ना. यावर आरपार झालं पाहिजे ना, असं ते म्हणाले.
रवी राणा यांच्या आरोपानंतर 7-8 आमदारांनी मला फोन केला. या आरोपांमुळे तेही व्यथित झाले आहेत. या एका मुद्द्यावर आम्ही तुमच्यासोबत असल्याचं या आमदारांनी सांगितलं आहे. त्यामुळे राणा यांनी पुरावे द्यावेत आणि मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनीह त्याची दखल घ्यावी, असं त्यांनी सांगितलं.
माझ्या बैठकीतला एक व्हिडिओ येणार आहे. चार पाच दिवसात हा व्हिडीओ व्हायरल होणार आहे. बच्चू कडूला थंड पाडायचं आहे. बच्चू कडूला शांत करायचं आहे. त्यामुळे माझ्यावर वेगवेगळे आरोप लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. तो व्हिडिओ आल्यावर मी बोलणारच आहे, असं सांगतानाच राज्य सरकार मदत करत नसेल तर केंद्राकडून मला अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
दरम्यान, या सर्व प्रकरणावर आमदार रवी राणा यांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माझे नेते आहेत. कोण काय अल्टिमेटम देतं याकडे मी लक्ष देत नाही. फडणवीस माझ्यासोबत आहेत. त्यामुळे कोण काय आरोप करतं आणि अल्टिमेटम देतं याकडे मी लक्ष देत नाही. जेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलावतील, तेव्हा अर्ध्या रात्री त्यांच्याकडे जाईल. ते जे सांगतील त्याचं पालन करणं माझं कर्तव्य आहे, अशी सावध प्रतिक्रिया राणा यांनी दिली.