अमरावती | 3 जानेवारी 2024 : आमदार बच्चू कडू यांनी थेट खासदार नवनीत राणांनाच अमरावतीतून प्रहारकडून लढण्याची ऑफर दिलीय. बच्चू कडूंनी महायुतीतून लोकसभेच्या 2 जागांची मागणी केलीय. अमरावती आणि अकोल्याची जागा कडूंना हवी आहे. तर, विधानसभेच्या 15 जागांची मागणी बच्चू कडूंची आहे. अमरावतीतून सध्या रवी राणांच्या पत्नी नवनीत राणा खासदार आहेत. त्या सध्या भाजपच्या बाजूनं आहेत. त्यामुळं अमरावतीची जागा, महायुतीतून मिळणं कठीण आहे, हे बच्चू कडूंनाही माहिती आहे. म्हणूनच त्यांनी नवनीत राणांना प्रहारच्याच तिकिटावर लढण्याची ऑफर दिलीय. तर, रवी राणांनी आभार मानत, भाजप आमच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचं सांगून अप्रत्यक्षपणे ऑफर नाकारलीय.
रवी राणांनी, बच्चू कडूंना युती धर्माचीही आठवण करुन दिलीय. प्रहारनं लोकसभेत युती धर्माचं पालन करावं. नाहीतर पुढे विधानसभेच्याही निवडणुका आहेत, असं सूचकपणे राणा बोललेत. अमरावती जिल्ह्यात बच्चू कडू आणि रवी राणांमधला अंतर्गत वाद जगजाहीर आहे णि म्हणूनच राणा लोकसभेसाठी बच्चू कडूंना युती धर्माची आठवण करुन देत आहेत. त्याचवेळी रवी राणांनी, बच्चू कडूंचे दुसरे आमदार राजकुमार पटेलांवरुन मोठा गौप्यस्फोट केलाय. राज कुमार पटेल भाजपच्या वाटेवर आहेत. त्यामुळं आपल्याच जागा सांभाळा, असं सांगत दुसऱ्यांना ऑफर देण्याच्या भानगडीत पडू नका हेच, राणांनी सांगण्याचा प्रयत्न केला.
बच्चू कडू अमरावतीच्या अचलपूरचे आमदार आहेत. रवी राणा अमरावतीच्या बडनेऱ्याचे आमदार आहेत. दोन्ही अपक्षच आहेत. मात्र दोघेही सरकारमध्येच आहेत. राणा भाजपच्या बाजूनं तर बच्चू कडू शिंदेंच्या बाजूनं आहेत. सध्या दोघेही एकमेकांना ऑफर आणि युतीधर्माची आठवण करुन देत असले तरी वर्षभराआधी एकमेकांना आव्हान आणि घरात घुसून मारण्याची भाषा करत होते. त्यानंतर आता बच्चू कडूंनी नवनीत राणांनाच, प्रहारकडून उमेदवारीची ऑफर दिलीय.