Eknath Shinde : बाळासाहेबांच स्वप्न मोदी-शाहंनी पूर्ण केलं – एकनाथ शिंदे
Eknath Shinde : काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आग्रही असल्यामुळे सरकार स्थापनेला विलंब होतोय ही चर्चा चालू आहे. त्यावरही एकनाथ शिंदे बोलले. त्यांनी अनेक गोष्टी त्यांच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केल्या.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपसाठी मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा केला. मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले. भाजपच्या मुख्यमंत्र्यांला आमचं समर्थन असेल, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. महायुतीला जनतेने स्पष्ट बहुमत दिलं आहे. पण मुख्यमंत्री पदावरुन पेच फसल्यामुळे राज्यात सत्ता स्थापनेला विलंब होत असल्याचा संदेश जनतेमध्ये जात होता. आज एकनाथ शिंदे यांनी अनेक गोष्टी स्पष्ट केल्या. मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानले.
यंदाच्या विधानसभा निवडणुकीत खरी शिवसेना कोणाची? या प्रश्नाच सुद्धा उत्तर मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फक्त 20 जागा जिंकता आल्या. तेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 57 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे मुंबईसह राज्यातील शिवसेनेचे नेतृत्व एकनाथ शिंदेंकडेच असणार आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सतत पत्रकार परिषदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहंवर टीका करत असतात. त्यांना गुजरात लॉबीचे नेते म्हणातत. संजय राऊत नेहमीच पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्यावर सडकून टीका करतात. शिवसेना फोडल्याचा आरोप करतात. आज एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत एक लक्षवेधी गोष्ट बोलून गेले.
‘लाडका भाऊ ही ओळख माझ्यासाठी मोठी’
“सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं. ते स्वप्न मोदी आणि शाह यांनी पूर्ण केलं. ते माझ्या पाठी पहाडासारखे उभे राहिले” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “मी अडीच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. दिवस रात्र काम केलं. कॉमन मॅनचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं. लाडका भाऊ ही माझी ओळख झाली. ही ओळख सर्वात मोठी आहे” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. “दोन-चार दिवसांपासून आम्ही नाराज असल्याची चर्चा आहे. पण आम्ही नाराज होणारे नाही. आम्ही घरात बसणारे नाही. आम्ही एकत्रपणे काम करू. आम्हाला मोठा विजय मिळाला आहे. आता महायुतीचं सरकार भक्कमपणे काम करणार आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.