Ramdas Kadam : उद्धव ठाकरेंनीच बाळासाहेबांच्या पाठित खंजीर खुपसला; रामदास कदम यांचा गंभीर आरोप
Ramdas Kadam : महाराष्ट्रात अमूक गद्दार, तमूक हरामखोर ही भाषा उद्धव ठाकरे यांची राहिली आहे. ती भाषा वापरताना पहिल्यांदा तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करून बघा. कोण गद्दार आहे? त्याचं आत्मपरीक्षण करून बघा. 51 आमदार का जातात? 12-14 खासदार का जातात?
मुंबई: शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम (ramdas kadam) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आणि घणाघाती आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंना (uddhav thackeray) मी माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन. त्यांनी शरद पवारांचं नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचं नेतृत्व ठेवलं असतं तर मी त्यांना शिवसेनेचे (shivsena) प्रमुख म्हटलं असतं. ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम करत नाहीत. ते शरद पवारांच्या मांडिवर बसून शरद पवारांच्या विचारांची सहमत होऊन ते काम करत आहेत. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी, बाळासाहेबांच्या पाठित खंजीर खुपसण्याचं काम, बाळासाहेबांच्या विचाराची गद्दारी ही दुर्देवाने उद्धव ठाकरे यांच्याकडून झाली आहे, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. टीव्ही 9 मराठीशी संवाद साधताना त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही तोंडसुख घेतलं आहे.
महाराष्ट्रात अमूक गद्दार, तमूक हरामखोर ही भाषा उद्धव ठाकरे यांची राहिली आहे. ती भाषा वापरताना पहिल्यांदा तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करून बघा. कोण गद्दार आहे? त्याचं आत्मपरीक्षण करून बघा. 51 आमदार का जातात? 12-14 खासदार का जातात? शेकडो नगरसेवक का जातात? आज माझ्या खेडच्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली जात आहे. हे हकालपट्टीचं काम सुरूच आहे. फक्त शिवसैनिकांना भावनात्मक करून ब्लॅकमेल करण्याचं काम सुरू आहे. तीन वर्षात आमदारांना भेटले असते तर ही वेळ आली नसती. तुम्ही आजारी होता, आदित्य ठाकरे तर आजारी नव्हते ना? असा सवाल रामदास कदम यांनी केला.
पालापाचोळा कुणाचा झाला?
नवे शिवसैनिक, तरुण मुलं तुमच्या भावनिक गोष्टीला बळी पडतील. पण जुने शिवसैनिक ऐकणार नाही. त्यांनी अनुभव घेतलाय. अनेक शिवसैनिकांची हत्या झाली. काहींनी तुरुंगवास भोगला. संसार वाऱ्यावर सोडला. ते सांगतील. प्रतिज्ञापत्र घेण्याची वेळ का आली? एवढा विश्वास का राहिला नाही? पालापाचोळा कुणाचा झाला? त्याचा विचार करा. शिंदेंकडे एवढे लोक जात आहेत. शिंदे, कदम कालचे शिवसैनिक नाहीत. उद्धव ठाकरेंना मराठा समाजातील लोकांना मोठं होऊ द्यायचं नाही. त्यांना संपवायचं आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
मला आणि माझ्या मुलाला संपवण्याचा डाव होता
राणे एकनाथ शिंदे कदम कोणत्याही मराठा नेत्याला मोठं होऊ द्यायचं नाही हे उद्धव ठाकरे यांना ठरवलं की काय असा मला संशय आहे. माझ्यासारख्या माणसाला बाजूला करता. तीन तीन वर्ष माझ्या तोंडाला लॉक लावला. मला तीन तीन वर्ष बोलू देत नाही. भाषणं करू देत नाही. उद्धव ठाकरे हॉस्पिटलमध्ये असताना सहा बैठका झाल्या. रामदास कदम आणि योगेश कदमला राजकारणातून संपवण्याचं या बैठकीत ठरलं. मिटिंगला कोण तर सुभाष देसाई, अनिल देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत, आदित्य ठाकरे या मिटिंगला होते. हॉस्पिटलला असूनही तुम्ही आम्हाला संपवायला निघाला. आम्हाला तुम्ही संपवत नाही. तर शिवसेनेला संपवत आहात. योगेश कदम आणि रामदास कदम यांना संपवण्याचा डाव रचला गेला. मला सांगा शिवसेना तुमची आई होती की राष्ट्रवादी?, असा सवालही त्यांनी केला.