शेतकरी संकटात, पण काही टोळ्यांची हप्तेखोरी, विरोधक पहिल्याच दिवशी आक्रमक; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभात्याग
राज्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली. पण पावसाचा जोर कमी असल्याने पुरेशी ओल जमिनीत तयार झालेली नव्हती. पेरण्या उशिरा होतील या भीतीपोटी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या.
मुंबई | 17 जुलै 2023 : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी अत्यंत आक्रमक होत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधकांनी सभागृहाचं कामकाज सुरू होताच शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष वेधलं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचं लक्षच नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृहात जोरदार गोंधळ घातला. त्यानंतर विरोधकांनी सरकारचा निषेद नोंदवत सभात्याग केला. विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण अधिवेशनभर विरोधक सरकारला चांगलंच घेरणार असल्याचं दिसून येत आहे.
सभागृहाचं कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी बोलायला सुरुवात केली. थोरात यांनी सभागृहाचं लक्ष शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे वेधलं. राज्यात बोगस बियाणांच्या टोळ्या फिरत आहेत. या सरकारला खाते विस्तार आणि खाते वाटपाची काळजी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे यांचं साफ दुर्लक्ष झालं आहे. शेतकरी संकटात आहे. पण काही टोळ्यांची हप्तेखोरी सुरू आहे, असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी केला. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, सरकार या प्रश्नावर चर्चा करायला तयार होत नसल्याचं दिसताच विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी सरकारचा निषेध करत सभात्याग केला.
शेतकऱ्यांच्या दारात कधी जाणार
शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने बघायला सरकारला वेळ नाही. मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप याच सरकार व्यस्त आहे. त्यात छोट्या छोट्या गोष्टींसाठी दिल्ली वाऱ्या कराव्या लागतात. त्यामुळे शेतकऱ्याच्या दारात सरकार कधी जाणार? शेतकऱ्याचे संकट कधी समजून घेणार असा संतप्त सवालही थोरात यांनी केला.
दुबार पेरणीची वेळ
राज्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली. पण पावसाचा जोर कमी असल्याने पुरेशी ओल जमिनीत तयार झालेली नव्हती. पेरण्या उशिरा होतील या भीतीपोटी शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. परंतु त्यानंतर किरकोळ पाऊस झाला आणि प्रखर उष्णतेने रेापे कोमेजली. त्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीची वेळ आली, असं त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्र, वाशिम, बुलढाणा, परभणी, हिंगोली आणि औरंगाबाद तसेच नगर, पुणे, सातारा आदी जिल्ह्यात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. दुबार पेरणीसाठी पुन्हा बियाण्याचे संकट शेतकऱ्यासमोर उभे राहिले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
विरोधकांचा सभात्याग
त्यानंतर विरोधकांनी विधानसभेत शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला. शिंदे सरकार शेतकरी प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे, पण सरकार काहीच करत नसल्याचंही विरोधकांनी म्हटलं आहे. त्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध नोंदवत सभात्याग केला.
आम्ही 10 हजार कोटी दिले
बाळासाहेब थोरात यांनी केलेले सर्व आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले. आम्ही शेतकरी प्रश्नावर गंभीर आहोत. आम्हाला शेतकऱ्यांची चिंता आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी हे सरकार आहे. जास्तीत पाऊस पडल्यावर पेरण्या होतील. बोगस बियाण्यांवर कडक कायदा केला जाईल. आम्ही आतापर्यंत शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत केली आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं.