चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. काँग्रेसला राज्यात केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला, ती म्हणजे चंद्रपूरची जागा. या मतदारसंघातून काँग्रेसचे बाळू धानोरकर विजयी झाले.
विशेष म्हणजे, बाळू धानोरकर हे काही मूळचे काँग्रेसी नेते नाहीत. तर लोकसभा निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून बाळू धानोरकर यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चंद्रपूरच्या जागेवर काँग्रेसने उमेदवार घोषित केला होता. मात्र, बाळू धानोरकरांसाठी काँग्रेसने उमेदवार बदलण्याचा निर्णय घेतला.
बाळू धानोरकर यांना काँग्रेसचं तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला. ते चंद्रपुरातील वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार होते.
धानोरकर यांच्यासमोर भाजपकडूनही तगडं आव्हान उभं होतं. भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे चंद्रपुरातून उभे होते. केंद्रीय मंत्री असलेल्या हंसराज अहिर आणि शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेल्या बाळू धानोरकर यांच्यात ‘काँटे की टक्कर’ झाली. मात्र, अखेर बाळू धानोरकर यांचा विजय झाला.
राज्यात फक्त काँग्रेसला एकच जागा मिळाली आणि ती बाळू धानोरकर यांच्या रुपाने. त्यामुळे मूळच्या काँग्रेसी उमेदवाराने नव्हे, पण शिवसेनेतून आलेल्या उमेदवाराने काँग्रेसची राज्यात लाज राखली, हे निश्चित.