मुंबई: दसरा मेळाव्याला (dussehra rally) अवघे काही दिवस बाकी असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यावरून भाष्य केलं आहे. दसरे मेळावे होतच असतात. पण दसरा मेळावा एकच आहे आणि तो म्हणजे शिवसेनेचाच, असं म्हणत उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी शिंदे गटाला टोला लगावला आहे. आज पोहरादेवीचे सुनील महाराज (sunil maharaj) यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. हाच धागा पकडून शिवसेनेचं काय होणार? असा सवाल करणाऱ्यांना उत्तर मिळाल्याचं सांगत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला चिमटा काढला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पोहरादेवीचे सुनील महाराज यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर झालेल्या या प्रवेश सोहळ्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांच्या मोजक्याच प्रश्नांची उत्तरे दिली. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे मी दसरा मेळाव्याच्या रॅलीतच देणार आहे, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याची उत्सुकता ताणून ठेवली.
आजपर्यंत आपण म्हणत होतो साधू, संत येती घरा तोचि दिवाळी दसरा. नवरात्रीत सुनील महाराज शिवसेनेत आले आहेत. ते एकटेच आले नाहीत. तर बंजारा समाजातील कडवट सैनिक शिवसेनेत आले आहेत, असं ते म्हणाले.
त्यावेळी न्याय देण्याचा प्रयत्न केला. ज्यांना न्याय दिला त्यांनीच पाठित वार केला हे लक्षात आलं. त्यामुळे बंजारा समाज आमच्यासोबत आला आहे. गद्दारी बंजारा समाजाच्या रक्तात नाही. यांचं भवितव्य घडवण्याची माझी जबाबदारी आहे, अशा शब्दात त्यांनी संजय राठोड यांच्यावर नाव न घेता टीका केली.
मी दसऱ्यानंतर फिरणार आहे. पोहरादेवीला जाणार आहे. देवीला भोग लावणार आहे. महाराष्ट्रभर फिरणार आहे. विदर्भातही जाणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेचं काय होणार? असं अनेकांना वाटत होतं. काय होणार या प्रश्नाचं उत्तर मिळण्याआधीच शिवसेना दहा पावलं पुढे गेली आहे. काल ऊसतोड कामगार आले होते. त्यांचा मेळावा होणार आहे. सर्व समाज शिवसेनेत येत आहे. त्यामुळे शिवसेना वाढत आहेत. आमचा कुणाला शह वगैरे नाही. मला पुढे जायचं आहे. समाज सोबत आल्यानंतर एखाद्या व्यक्तिला शह देणं ही क्षुल्लक गोष्ट आहे, असंही ते म्हणाले.
शिवसेना एकच आहे. दसरे मेळावे होत असतात. पंकजाताईही दसरा मेळावा घेतात. पण दसरा मेळावा एकच आणि तो म्हणजे शिवसेनेचाच, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं.