Ajit Pawar : ‘लोक म्हणतात या वयात दादांनी साहेबांना सोडायला नको होतं, मी…’ काय म्हणाले अजित पवार?
"मी 84 साली राजकारणात आलो. 1987 पासून 2023 पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा होती. मित्रांनो तुम्हाला माहित नसेल, आम्ही लहान असताना आम्हाला आजी-आजोबांनी सांगितलेलं, आमचं सगळं कुटुंब शेकापच होतं. स्वर्गीय वसंतदादा पवार आमचे थोरले काका पोटनिवडणुकीला उभे होते"
“लोकसभेची ही निवडणूक गावकी-भावकीची निवडणूक नाही. देशाचं भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे. तुम्हाला मोदी पंतप्रधान पाहिजेत की राहुल गांधी पाहिजेत हा निर्णय जनतेला घ्यायचा आहे. बरेच जणांना हा प्रश्न आहे की, अजित पवार यांनी हा निर्णय का घेतला, आपण सगळ्यांनी माझं काम बघितलं आहे” असं अजित पवार म्हणाले. ते इंदापूरमध्ये एका प्रचारसभेला संबोधित करताना हे बोलले. “तुम्ही सगळ्यांनी मला कारखान्याचा डायरेक्टर केलं. मला कधी वाटलं नव्हत की, मी राजकारणात येईन. कारण माझा स्वभाव हा असा आहे. एक घाव दोन तुकडे. एखाद काम होणार असेल तर हो सांगतो, नाही तर नाही सांगतो. मला खूप जणांनी सांगितलेलं की तुम्ही राजकारणात येणार नाही. पण मला लोकांनी प्रेम, पाठिंबा दिला” असं अजित पवार म्हणाले.
“हर्षवर्धन पाटील आणि मी आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत. देश महासत्ता बनावी, सर्व जाती-धर्मातील लोकं एकत्र राहावी ही भावना आहे” असं अजित पवार म्हणाले. “ही भावकीची निवडणूक नाही. काहीजण म्हणतात की, या वयात दादांनी साहेबांना सोडायला नको होतं, अशी पारावर चर्चा होते, मी साहेबाना कधी सोडलं नाही” असं अजित पवार म्हणाले.
अजित पवारांनी काय आठवण करुन दिली?
“मी 84 साली राजकारणात आलो. 1987 पासून 2023 पर्यंत साहेब म्हणतील ती पूर्व दिशा होती. मित्रांनो तुम्हाला माहित नसेल, आम्ही लहान असताना आम्हाला आजी-आजोबांनी सांगितलेलं, आमचं सगळं कुटुंब शेकापच होतं. स्वर्गीय वसंतदादा पवार आमचे थोरले काका पोटनिवडणुकीला उभे होते. तेव्हा पवारसाहेब विद्यार्थी होते. पवारसाहेबांनी तेव्हा विरोधात काम केलं. त्यावेळी अख्ख पवार कुटुंब एकीकडे आणि पवार साहेब एकीकडे असं होतं. 1967 ला साहेबांना यशवंतराव चव्हाण साहेबांनी संधी दिली. इथे बसणाऱ्या प्रत्येकाला कुणी ना कुणी संधी दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांना घोलप साहेबांनी, मला पवार साहेबांनी पवार साहेबांना यशवंतराव चव्हाणसाहेबांनी संधी दिलीय. 1978 ला पवार साहेबांनी पुलोदला आणून वसंतदादांच सरकार पाडलं. यशवंतराव चव्हाणांच, तेव्हा पवारसाहेबांनी ऐकलं नाही” याची आठवण अजित पवारांनी करुन दिली.