मुंबई : 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची (NCP) स्थापना झाली. पण आजतागायत राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्याची सल राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनात कायम आहे. याचीच प्रचिती राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या बोलण्यातून जाणवली. “राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, सगळा पक्ष घेऊन दर्शनाला येईन”, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याचा मान राष्ट्रवादीला मिळालेला नाही. ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी सुप्रिया सुळे यांनी तुळजा भवानी मातेच्या (Tulajabhavani Mata) चरणी प्रर्थना केली. सुप्रिया सुळे तुळजापूर दौऱ्यावर असताना त्यांनी भवानी मातेचं दर्शन घेतलं. तेव्हा माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली इच्छा बोलून दाखवली.
सुप्रिया सुळे यांनी काल (रविवार) तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. तेव्हा त्यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून त्यांनी नवस केला. “राज्यात अजूनपर्यंत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झालेला नाही. दिवसेंदिवस राज्यात राष्ट्रवादीची ताकद वाढत आहे. आता पुढच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. अंबाबाईच्या आशीर्वादाने जर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण पक्ष घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
सुप्रिया सुळे काल (रविवार) तुळजापूरमध्ये होत्या. त्यांनी तिथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. त्याचबरोबर त्यांनी तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं. तेव्हा त्यांनी “यंदा राज्यात चांगला पाऊस होऊ दे, शेतमालाला चांगला बाजारभाव मिळू दे, महागाई कमी होऊ दे”, अशी प्रार्थना केली.
महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री कधी मिळणार? हा प्रश्न महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय वर्तुळात सतत चर्चेत असणारा विषय आहे. याविषयी सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आलं तेव्हा “या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी ज्योतिषी नाही. याचा निर्णय जनताच घेईल. या प्रश्नाचं उत्तर जनताच मतांच्या रूपात देईल”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. दरम्यान, महाराष्ट्राच्या महिला मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेत सुप्रिया सुळे यांचं नाव आग्रस्थानी असतं. याशिवाय, पंकजा मुंडे, यशोमती ठाकूर यांच्याही नावाची चर्चा होत असते.