‘अजित दादा माझे मोठे भाऊ, धाकट्या बहिणीने मोठ्या भावाला…’, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
"मी बारामतीच्या लढतीकडे निवडणूक म्हणून पाहत आहे. माझी कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही. मी कधीच कुणाबद्दल वैयक्तिक बोलत नाही. माझी लढाई ही युपीए विरुद्ध एनडीए अशी आहे. माझी लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे", अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. बारामतीत येत्या 7 मे ला मतदान होणार आहे. त्यामुळे मतदारसंघात जोरदार प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. याच निमित्ताने आम्ही आज सुप्रिया सुळे यांचा प्रचार नेमका कसा सुरु आहे, ते नागरिकांच्या भेटीगाठी घेत असताना काय-काय घडतंय? हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे यांनी आज भोर तालुक्यातील अनेक गावांमध्ये प्रचार केला. यावेळी अनेक नागरिकांनी त्यांचं स्वागत केलं. सुप्रिया सुळे यांच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या दरम्यान आम्ही सुप्रिया सुळे यांची भूमिका देखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सुप्रिया सुळे यांनी मनमोकळेपणाने त्यावर प्रतिक्रियादेखील दिली.
“पाच वर्षाची जी टर्म असते. प्रत्येक महिन्याचा पहिला सोमवार हा पुण्यातच असतो. त्यानंतर पुढचे चार दिवस आणि 9 तालुक्यांसाठी 9 दिवस, असे साधारणपणे 14 दिवस मी बारामती लोकसभा मतदारसंघात असते. लोकसभेचं अधिवेशन असेल तर मी दिल्लीला अधिवेशन असेल. लोकसभेत माझी 97 टक्के हजेरी आहे. एखादी निवडणूक वगैरे असेल तर कधीतरी मी पार्लमेंटमध्ये गैरहजर असते. माझ्या मुलांच्या बोर्डाच्या परीक्षा होत्या तेव्हाही मी दिल्लीत लोकसभेच्या सभागृहात होती. माझा वेळ असाच दुभागला जातो. मी लोकप्रतिनिधी आहे. ते मी केलंच पाहिजे”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“मी बारामतीच्या लढतीकडे निवडणूक म्हणून पाहत आहे. माझी कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही. मी कधीच कुणाबद्दल वैयक्तिक बोलत नाही. माझी लढाई ही युपीए विरुद्ध एनडीए अशी आहे. माझी लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आहे. महाराष्ट्रात तरुणांना नोकऱ्या मिळत नाही. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे लढते आहे. अन्यायाविरोद्ध कुणीतरी लढलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
अजित पवार गट भाजपसोबत का गेला?
“अजित पवार यांचा गट भाजपसोबत का गेले, याचं उत्तर दुनियेला माहिती आहे. त्यामुळे परतपरत तेच तेच उगाळत बसायचं. मी वास्तवात जगते. जे गेलं त्यावर चर्चा करुन उपयोग नाही. या सगळ्यांनी काय केलं, यापेक्षा देशातली महागाई, बेरोजगारी समस्या माझ्यासाठी मोठ्या आहेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
“आमच्याकडून आम्ही प्रयत्न केले आहेत. सोशल मीडिया आहे. चर्चाही खूप आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाची देशात चर्चा होत असेल तर शरद पवार या नावात काहीतरी ताकद आहे ना? देशात एका नावाचं वलय फिरत राहतं. बारामती म्हणजे शरद पवार आणि शरद पवार म्हणजे बारामती दोन्ही एकच आहे”, असं सु्प्रिया सुळे म्हणाल्या.
अजित दादांना काय सांगाल?
अजित दादांना काय सांगाल? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फार बोलणं टाळलं. “अजित दादा माझे मोठे भाऊ आहेत. धाकट्या बहिणीने मोठ्या भावाला काही सांगायचं नसतं असे संस्कार माझ्यावर झाले आहेत. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठे असलेल्यांचा आदर आणि लहानांना प्रेम ही आपली जबाबदारी असते”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
अजित दादा परत आले तर?
अजित दादा परत आले तर? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांना विचारण्यात आला. “याचं उत्तर मी देऊ शकत नाही. कारण मी वास्तविकतेत जगते. त्यांनी एक वेगळी वैचारिक भूमिका घेतलेली आहे. एखाद्याने एखादी वैचारिक भूमिका घेतली असेल तर या लोकशाहीमध्ये त्यांना आपण नेहमी शुभेच्छा दिल्या पाहिजेत”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.