‘या’ एका घटनेमुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा तत्काळ मंजूर झाला? काय आहे कारण ?
गेल्याचवर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून महाराष्ट्राला महान राज्य म्हणणारे कोश्यारी एकाच वर्षात या महान राज्याला का कंटाळले हा प्रश्न आहे. महाराष्ट्राने राज्यपाल पदाची नेहमीच गनिमा कायम राखली आहे. पण,
मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा अखेर मंजूर करण्यात आला आहे. त्यांच्या जागी आता महाराष्ट्राला रमेश बैस हे नवे राज्यपाल लाभले आहेत. तत्पूर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना पत्र लिहून आपल्याला पदमुक्त करावे अशी विनंती केली होती. गेल्याचवर्षी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून महाराष्ट्राला महान राज्य म्हणणारे कोश्यारी एकाच वर्षात या महान राज्याला का कंटाळले हा प्रश्न आहे. महाराष्ट्राने राज्यपाल पदाची नेहमीच गनिमा कायम राखली आहे. पण, कोश्यारी यांनी केलेली वादग्रस्त विधाने त्यांच्या अंगलट आली. छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्याबद्दल वाद वाढेल अशी विधाने करून मराठा आणि बहुजन समाजाला त्यांनी दुखावले. उद्धव ठाकरे सरकार आणि राज्यपाल यांच्यात सर्व काही आलबेल होते असे नव्हते. त्यात राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी मंजूर न केल्यामुळे हे मतभेद वाढले होते.
राज्यात ठाकरे सरकार जाऊन शिंदे सरकार आले. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यातच कोश्यारी यांची वादग्रस्त विधाने पुढे आल्याने विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्र संताप पसरला आणि त्याचे रूपांतर महाविकास आघाडीच्या महामोर्चात झाले. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, संभाजी बिग्रेड यांच्यासह अनेक छोट्या मोट्या संघटना या मोर्चात सामील झाल्या होत्या. राज्यपालांचा राजीनामा घ्यावा, त्यांना महाराष्ट्रातून हटविण्यात यावे. हीच या मोर्चाची प्रमुख मागणी होती.
महाविकास आघाडीचा महामोर्चा यशस्वी झाला. त्याची दखल केंद्रीय नेतृत्वाने घेतली. हे प्रकरण महाराष्ट्रात आपल्याला भारी पडू शकते याची जाणीव झाली, पण, याचवेळी महाराष्टाचे धुरंधर फडणवीस पुढे आले. आताच ही कारवाई केली तर त्याचे श्रेय विरोधक घेतील. विरोधी पक्ष हावी होईल असे निमित्त करून ही कारवाई थांबवली.
राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्रातून जाण्याची तयारी केली होती. याचाच एक भाग म्हणून त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून राज्यपाल पदावरून मुक्त करण्यात यावे अशी विनंती केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील पहिल्या भेटीदरम्यान त्यांनी आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा व्यक्त केली होती.
मोदी यांच्या त्या भेटीनंतर राज्यपाल कोश्यारी यांनी फार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक कार्यक्रम घेणे टाळले. मुंबई सोलापूर आणि मुंबई शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेसच्या उदघाटनासाठी शुक्रवारी पंतप्रधान मोदी मुंबईत आले होते. केंद्र सरकारचे काही राजशिष्टाचार नियम आहेत. त्यानुसार पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्या स्वागतासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना आवर्जून उपस्थित रहावे लागते.
पंतप्रधान मोदी मुंबईत आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी राज्यपाल उपस्थित राहिले. पण, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत पुढील कार्यक्रमास जाणे त्यांनी टाळले. यासाठी प्रकृतीचे कारण पुढे करण्यात आले. परंतु, आपला राजीनामा मंजूर केला नाही याच्या नाराजीमुळेच कोश्यारी यांनी पुढील कार्यक्रमास जाण्याचे टाळले असे बोलले जाते.
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा कार्यक्रम झाला आणि ते पुन्हा दिल्लीला परतले. त्यानंतर वेगवान हालचाली झाल्या आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह १३ राज्यपालाची बदली केली गेली. मात्र, यातही अन्य राज्यपालांना दुसऱ्या राज्यात पाठविण्यात आले तर कोश्यारी अन्य राज्यात पाठविण्यात आले. त्यांच्या इच्छेप्रमाणे अध्ययन, मनन व चिंतन करण्यासाठी राष्ट्रपतींनी वेळ दिला अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.