मंत्रिपद न मिळाल्याने नाराज राष्ट्रवादी आमदार प्रकाश सोळंके राजीनामा देणार
पक्षात पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद मिळत, मात्र, मी चार वेळा निवडून आलो, तरीही मला मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देणार आहे.
बीड : माहाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. मात्र, मंत्रिमंडळ विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या आमदारांची नाराजी आता समोर येत आहे. राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. प्रकाश सोळंके यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा देण्यासाठी वेळ मागितली आहे. त्यांना उद्या (31 डिसेंबर) दुपारी 12 वाजताची वेळ देण्यात आली आहे (MLA Prakash Solanke Will Resign).
“मी नाराज वगैरे नाही, माझा भ्रमनिरास झाला आहे. सध्या मी राजकारणातून निवृत्ती घ्यायच्या मानसिकतेत आहे. मी राजकारण करायला लायक आहे, की नाही असा मला प्रश्न पडला आहे. ज्यांना गॉडफादर आहेत त्यांचं राजकारणात सगळं चालतं, मला कुणी गॉडफादर राहिलेला नाही, त्यामुळे मी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझा राजीनामा दिल्यानंतर काय बोलायचं ते बोलेन. सध्या मात्र मी निराश झालो आहे”, अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्रकाश सोळंके यांनी ‘टीव्ही-9 मराठी’शी बोलताना दिली.
आमदार प्रकाश सोळंके हे चार वेळा माजलगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. पक्षात पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद मिळत, मात्र, मी चार वेळा निवडून आलो, तरीही मला मंत्रिपद मिळालं नाही. त्यामुळे मी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं प्रकाश सोळंके यांनी सांगितलं.
आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांची नाराजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही सांगितली आहे. तसेच, त्यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशीही चर्चा केली आहे.
ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार
विधानभवन परिसरात महाविकास आघाडीच्या 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 36 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. विस्तारामध्ये राष्ट्रवादीच्या 14, शिवसेनेच्या 12, तर काँग्रेसच्या 10 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, आदित्य ठाकरे यांच्यासह 36 मंत्र्यांचा शपथविधी झाला. यावेळी मंत्र्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.
MLA Prakash Solanke Unhappy With NCP