बीड : सलग दोन वर्ष दुष्काळाने होरपळलेल्या बीडमध्ये आज पाण्याची नासाडी होताना पाहायला मिळाली. बीडमधील परळीत रस्ता स्वच्छ करण्यासाठी हजारो लिटर पाणी ओतण्यात आलं. राष्ट्रवादीचे परळी नगर परिषदेचे (Parli nagar Parishad) गटनेते वाल्मिक कराड यांच्या वाढदिवसानिमित्त परळी नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात येतं आहे. या दरम्यान, रस्ता स्वच्छ करण्यासाठी टँकरने पाणी ओतण्यात आले. परळी शहरातून दररोज अवैधरित्या राखेची वाहतूक सुरु आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावर राखीचं साम्राज्य दिसून येत आहे. याच राखेची धूळ साफ करण्यासाठी हजारो लिटर पाणी वाया घालवलं जात आहे (Wastage Of Water).
गेल्या दोन वर्षात परळीकरांना भीषण दुष्काळाचा सामना केला. मात्र, सध्या मुबलक पाणीसाठा असल्याने याचं नियोजन करण्याऐवजी पाण्याचा अपव्यय होतो आहे. त्यामुळे हा अपव्यय थांबविण्यात यावा, अशी मागणी सर्वसामान्य परळीकरांकडून करण्यात येत आहे. बीड जिल्हा भीषण दुष्काळी जिल्हा म्हणून ज्ञात आहे. दुष्काळावेळी परळीत तब्बल पंधरा दिवसाला एकदा पाणी मिळायचं. मात्र, याच परळी शहरात नेत्याच्या दिमतीला लाखो लिटर पाण्याची नासाडी करुन वाढदिवस साजरा केला जातो, अशी टीकाही केली जात आहे.
परळी नगर परिषदेवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांचा ताबा आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडच्या पालकमंत्री होत्या, त्याकाळात धनंजय मुंडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी परळी शहराला पाणीपुरवठा करा, अशी आर्त साद घातली होती. मात्र, आता परळी नगर परिषदेपासून तर राज्यापर्यंत राष्ट्रवादीची सत्ता आहे. सत्ता हातात असतानादेखील या पुढाऱ्यांकडून सत्तेचा असा दुरुपयोग पाहायला मिळतो आहे, असंही म्हटलं जात आहे.
कोण आहेत वाल्मिक कराड?
वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे खंदे समर्थक आहेत. धनंजय मुंडे यांनी भाजप सोडल्यानंतर त्याचवेळी खांद्याला खांदा लावून वाल्मिक कराड हे राष्ट्रवादीत आले. त्यामुळे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात. नगर परिषद असो, की पंचायत समिती सर्वच निवडणुकांची जबाबदारी वाल्मिक कराड यांच्याकडे असते. परळीत कुठलेही कार्यक्रम वाल्मिक कराड हेच आयोजित करतात. त्यामुळेच वाल्मिक कराड यांचा 51 वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात करण्यासाठी नगर परिषदेकडून पाण्याची अशी नासाडी करण्यात आली.