Santosh Deshmukh Case : ‘संतोष अण्णाच्या मारेकऱ्यांना…’ सक्षणा सलगर यांचं आक्रमक भाषण
Santosh Deshmukh Case : "माझ्या बहिणीच कुंकू पुसलं. दोन लेकरं अनाथ झाली. ही दडपशाही, गुंडागर्दी मातीत मिसळल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. कारण हा लढा कुठल्या जातीचा नाही. हा लढा मराठी माणसासाठी आहे" असं सक्षणा सलगर म्हणाल्या.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. अजूनही त्यांचे तीन मारेकरी मोकाट आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होतोय. त्याला अजून अटक झालेली नाही. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर अटक व्हावी, त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी आज बीडमध्ये विराट मूक मोर्चा निघाला आहे. हा मोर्चा गर्दीचे उच्चांक मोडणारा आहे. लोकांच्या मनात एक संताप, रोषाची भावना आहे. आज मोर्चाच्या स्थळी नेत्यांची भाषण सुरु झाली आहेत.
शरद पवार पक्षाच्या सक्षणा सलगर यांनी आक्रमक भाषण केलं. “आज बीडमध्ये आम्ही सगळे जण इकडे कुठली जात-पात म्हणून नाही. महाराष्ट्र धर्म म्हणून उपस्थित आहोत. आम्ही आपले कर्तबगार बंधू संतोष अण्णा देशमुख यांना न्याय देण्यासाठी आलो आहोत. शेवटच्या श्वासापर्यंत लढाई लढायची आहे” असं सक्षणा सलगर म्हणाल्या. “माझ्या बहिणीच कुंकू पुसलं. दोन लेकरं अनाथ झाली. ही दडपशाही, गुंडागर्दी मातीत मिसळल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही. कारण हा लढा कुठल्या जातीचा नाही. हा लढा मराठी माणसासाठी आहे” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.
‘महाराष्ट्राच्या जनतेने घाबरायचं नाही’
“महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर, अहिल्याबाई होळकर आणि संविधानाने चालणारा आहे. आज जितेंद्र आव्हाड, सुरेश अण्णा, संदीप क्षीरसागर असेल हे जात म्हणून नाही, आपला माणूस म्हणून संतोष अण्णाच्या पाठिशी आहेत. त्यामुळे कोणी कितीही मोठा असला, तरी महाराष्ट्राच्या जनतेने घाबरायचं नाही, अण्णाच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे” असं सक्षणा सलगर म्हणाल्या.