भागवत कराड आणि देवेंद्र फडणवीस भेटीत काय घडलं?, हास्यविनोद ते गंभीर चर्चा; ‘हे’ चार फोटो काय सांगतात?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या आठवड्यात दिल्लीत होते. यावेळी त्यांनी केंद्रातील अनेक नव्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांची फडणवीस यांनी घेतलेली भेट अधिकच चर्चेत राहिली. (bhagwat karad)
मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या आठवड्यात दिल्लीत होते. यावेळी त्यांनी केंद्रातील अनेक नव्या मंत्र्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांची फडणवीस यांनी घेतलेली भेट अधिकच चर्चेत राहिली. आता या भेटीचे चार फोटो कराड यांनी ट्विट केले आहेत. यातून फडणवीस आणि कराड अत्यंत क्लोज आल्याचं दिसून येत असून दोघांमध्ये हास्यविनोद तसेच गंभीर चर्चा झडतानाही दिसत आहे. त्यामुळे या फोटोवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (bhagwat karad shared four photo with devendra fadnavis, read inside story)
नाराजीचं कारण काय?
गेल्या आठवड्यात केंद्र सरकारचा विस्तार करण्यात आला. नव्या विस्तारात भाजप नेत्या खासदार प्रीतम मुंडे यांना संधी मिळेल अशी चर्चा होती. मात्र, भाजपने डॉ. भागवत कराड यांना मंत्रिपद दिलं. विशेष म्हणजे भागवत कराड हे राज्यसभेचे सदस्य आहेत. ते लोकसभेवर कधीही निवडून आलेले नाहीत. शिवाय त्यांची राज्यसभेची ही पहिलीच टर्म आहे. तर प्रीतम या लोकांमधून निवडून आलेल्या आहेत. त्या लोकसभेच्या खासदार असून त्यांची दुसरी टर्म आहे. शिवाय त्याही उच्च शिक्षित आणि मास लीडर आहेत. कराड आणि प्रीतम दोघेही वंजारी समाजातून येतात. तरीही त्यांना डावलून कराड यांच्या पारड्यात मंत्रिपद टाकल्याने मुंडे भगिनी नाराज होत्या. पंकजा मुंडे आणि प्रीतम यांनी कराड यांच्या अभिनंदनाचं ट्विटही केलं नव्हतं. त्यामुळे या नाराजीला बळ मिळत होतं. त्यातच पंकजा मुंडे यांनी दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी प्रीतम मुंडे मंत्रिपदासाठी कशा योग्य होत्या हेच ठासून सांगण्याचा प्रयत्न केला.
भेट झाली, पंकजाकडून ट्विट नाही, कराडांनी फोटो टाळले
त्याचवेळी पंकजा मुंडे या दिल्लीला गेल्या. त्यामुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना हवा मिळाली. यावेळी त्यांनी दिल्लीत कराड यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. पण कराड यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केल्याचं ट्विट पंकजा यांनी केलं नाही. या भेटीचे फोटोही शेअर केले नाही. कराड यांनी पंकजा यांच्याशी भेट झाल्याचं ट्विट केलं. पण त्यांनीही फोटो शेअर केले नाही. त्यानंतर पंकजा यांनी मुंबईत समर्थकांशी संवाद साधत पुन्हा एकदा नाराजी नसल्याचं जाहीर केलं. मात्र, हे करताना त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी प्रीतमच कशा योग्य होत्या हेही वारंवार सांगितलं. त्यामुळे पंकजा यांच्या मनात बहीण मंत्री न झाल्याची सल टोचत असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
कराड यांचं काय होतं ट्विट?
कराड यांची पंकजा यांनी भेट घेतली होती. त्यांचं कराड यांनी ट्विट केलं. पण फोटो शेअर केले नव्हते. आज पंकजाताई दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली… मन मोकळे झाले.. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली..मी मंत्री झालो मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत.. त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या, असं कराड यांनी म्हटलं होतं.
आज @Pankajamunde ताई दिल्ली मध्ये बैठकीसाठी आल्या त्यांची भेट घेतली…मन मोकळे झाले..मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली..मी मंत्री झालो मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत..त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या..
— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) July 12, 2021
फडणवीसांच्या भेटीगाठी
त्यानंतर या आठवड्यात देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले. यावेळी त्यांनी नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. इतर मंत्र्यांनाही ते भेटले. मात्र, चर्चेत राहिली ती फडणवीस कराड यांची भेट. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? फडणवीसांनी कराड यांना काय सल्ला दिला? कराड यांना महाराष्ट्रात ओबीसींचे नेते म्हणून भाजप प्रोजेक्ट करणार आहेत का? आदी प्रश्न या भेटीच्या निमित्ताने उपस्थित केले गेले. मात्र, या भेटीचा तपशील बाहेर आलाच नाही. आता कराड यांनी फडणवीसांसोबतचे चार फोटो केल्याने या फोटोतूनच भेटीत नेमकी काय चर्चा झाली असावी, याचे संकेत मिळत आहेत.
फोटो काय सांगतात?
कराड यांनी आज एकूण चार फोटो पोस्ट केले आहेत. एका फोटोत फडणवीस कराड यांचं गुच्छ देऊन अभिनंदन करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोत फडणवीस कराड यांच्या कुटुंबीयांसोबत दिसत आहेत. पण या दोन फोटोपेक्षा दुसरे दोन फोटो महत्त्वाचे आहेत. यातील एका फोटोत कराड आणि फडणवीस खुर्चीवर बसलेले आहेत. कराड आदबशीर बसलेले दिसत आहेत. त्यातून त्यांचा फडणवीसांप्रतींचा आदर दिसून येतोय. तर फडणवीस अत्यंत आरामात बसलेले दिसत आहेत. या फोटोत कराड यांच्या तोंडाला मास्क आहे. दोघेही समोर बघून दिलखुलास हसताना दिसत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कुणी तरी उपस्थित असावं आणि काही तरी विनोद झाला असावा त्यामुळे दोघेही या तिसऱ्या व्यक्तीकडे बघून हसताना दिसत आहेत.
तर, शेवटच्या फोटोत कराड आणि फडणवीस अत्यंत गंभीर विषयावर चर्चा करताना दिसत आहेत. या फोटोत कराड यांच्या तोंडावरचं मास्क त्यांच्या हातता दिसतंय. तर फडणवीस खाली मान घालून काही तरी सांगतानाच दिसत आहेत. दोघांचेही चेहरे धीरगंभीर आहेत. त्यामुळे भेटीत बरीच गंभीर चर्चा झाली असावी असं दिसत आहे. या भेटीत नेमकं काय झालं? हे कराड आगामी काळात महाराष्ट्रात काय रोल निभावतात त्यातूनच यथावकाश स्पष्ट होईल, असं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (bhagwat karad shared four photo with devendra fadnavis, read inside story)
Hon. LOP Shri @Dev_Fadnavis Ji had come home for lunch on my birthday. He spent time interacting with me and my family. He congratulated me on becoming the MOS Finance. It was really nice of time to be so thoughtful. #ministerkaradupdates pic.twitter.com/2VxlZ53MHp
— Dr Bhagwat Kishanrao Karad (@DrBhagwatKarad) July 18, 2021
संबंधित बातम्या:
पंकजा मुंडे अचानक दिल्लीला रवाना, जेपी नड्डांशी चर्चा करणार; तर्कवितर्कांना उधाण
मी संपले असते तर मला संपवायचे प्रयत्नही संपले असते; पंकजा मुंडेंचा भाजपवर अप्रत्यक्ष वार
दबावतंत्र करायचं असेल तर शक्तीप्रदर्शनासाठी जागा पुरणार नाही; पंकजा मुंडेंचा सूचक इशारा
(bhagwat karad shared four photo with devendra fadnavis, read inside story)