नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्यानं मुंडे समर्थकांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यामुळे राजीनामा सत्रही सुरू झालंय. त्यातच पंकजा मुंडे दिल्लीत गेल्यानं चर्चांना उधाण आलंय. आता केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिल्लीत पंकजा मुंडे यांची भेट घेतल्याचं ट्विट केलंय. पंकजा मुंडे यांची भेट घेतली, मन मोकळं केलं, असं म्हणत त्यांनी या दिल्लीतील भेटीची माहिती दिलीय. यानंतर पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलंय.
भागवत कराड यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “आज (12 जुलै) पंकजा मुंडे दिल्लीमध्ये बैठकीसाठी आल्या. त्यांची भेट घेतली. मन मोकळे झाले. मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली. मी मंत्री झालो, मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत. त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या.”
आज @Pankajamunde ताई दिल्ली मध्ये बैठकीसाठी आल्या त्यांची भेट घेतली…मन मोकळे झाले..मुंडे साहेबांची आठवण आवर्जून झाली..मी मंत्री झालो मुंडे साहेब माझे नेते होते आणि आज ताई आहेत..त्यांनीही साहेबांच्या प्रमाणे शुभेच्छा दिल्या..
— Dr Bhagwat Karad (@DrBhagwatKarad) July 12, 2021
बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये डावलण्यात आल्यानं बीड जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांचं राजीनामा सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात भाजप पदाधिकाऱ्यांत प्रचंड नाराजीचे सूर असून आणखीन राजीनामे येण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशा आशयाचं पत्र भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लिहिलं आहे. 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन जिल्हाध्यक्ष मस्के हे मुंबईकडे रवाना झाले आहेत.
उद्या भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन यावर चर्चा करणार आहेत. या राजीनामा सत्रावर भाजप प्रदेश कार्यकारिणी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पदांचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या पत्नी जिल्हा परिषद सदस्या जयश्री मस्के यांचाही समावेश आहे. त्यामुळे राजेंद्र मस्के यांच्याही निर्णयाकडे लक्ष वेधले आहे.
Bhagwat Karad tweet about meeting with Pankaja Munde in Delhi